

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शहरातील मध्यवस्तीमध्ये विविध कार्यक्रमांसाठी दौरा, विरोधकांनी दिलेला आंदोलनाचा इशारा आणि दिवसा पुण्यात असलेला वाहतुकीचा ताण, अशा स्थितीत अत्यंत कडेकोट बंदोबस्त पार पाडत पुणे पोलिसांनी अत्यंत कठीण परीक्षा मंगळवारी निर्विघ्नपणे पार पाडली. काही ठिकाणी लोकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले असले, तरी पुण्यातील वाहतूक जास्तीत जास्त सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यानिमित्त शहरातील मध्यवस्तीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्यवस्तीतील वाहतूकव्यवस्थेत मंगळवारी सकाळपासून वाहतूक बदल करण्यात आले होते. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या भागातील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात पोलिसांनी तात्पुरते कठडे उभे केले होते. सोमवारपासून चौकाचौकांत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मध्य भागाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, दुपारनंतर पंतप्रधानांचे पुण्यातून प्रस्थान झाल्यानंतर वाहतूक आणि व्यवहार पूर्वपदावर आले आणि पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या आठवड्यापासून पोलिसांनी पंतप्रधान मोदींच्या दौर्यानिमित्त बंदोबस्ताची तयारी सुरू केली होती.
त्यातच पुण्यात अल सुफा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडले होते. त्यामुळे हा दौरा संवदेशनशील बनला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा पुण्यात तळ ठोकून होत्या. टिळक चौकातून मोदींचा ताफा लक्ष्मी रस्त्याने येऊन टिळक रस्त्याकडे वळला. या वेळी संपूर्ण रस्ता निर्मनुष्य करण्यात आला होता. अत्यंत चोख पोलिस बंदोबस्त सर्वत्र ठेवण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त
सुरक्षेची खबरदारी म्हणून मध्य भागातील उंच इमारतींच्या छतांवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान दौर्यानिमित्त बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती. पुणे पोलिस दलातील पाच हजार पोलिस कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
पीएमपी बंद असल्याने मनस्ताप
मध्य भागातील बहुतांश मार्गांवरील पीएमपी सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार महिलांची गैरसोय झाली. सदाशिव पेठ, टिळक रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ, डेक्कन जिमखाना परिसरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मोदी यांचे प्रस्थान झाल्यानंतर दुपारी चारनंतर शहरातील व्यवहार पूर्ववत झाले. रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस खुले करून देण्यात आले. दौर्यामुळे व्यापारी पेठेतील व्यवहार ठप्प झाले होते. व्यावसायिक, नोकरदारांच्या दृष्टीने मंगळवारचा अर्धा दिवस मनस्तापाचा ठरला. सकाळी रस्ते बंद ठेवल्याने वळसा घालून नागरिकांना कामावर पोहोचावे लागले.
हेही वाचा :