भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय; वनडे मालिका २-१ ने जिंकली

भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय; वनडे मालिका २-१ ने जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना टीम इंडियाने २०० धावांनी जिंकला. यासह भारताने मालिका २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच विकेट गमावत ३५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५१ धावा करू शकला आणि २०० धावांनी सामना गमावला.

कॅरेबियनविरुद्ध सलग 13 वी वनडे मालिका जिंकली

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग 13 वी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारताने एकाच संघाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. या बाबतीत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 वनडे मालिका जिंकली आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 200 धावांनी पराभव केला. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमधला हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 224 धावांनी पराभव केला होता.

इशान, गिलसह चौघांची तडाखेबंद अर्धशतके

शुभमन गिल (85), इशान किशन (77), हार्दिक पंड्या (नाबाद 70) व संजू सॅमसन (51) या चौघांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या बळावर भारताने विंडीजविरुद्ध तिसर्‍या व शेवटच्या वन-डे लढतीत निर्धारित 50 षटकांत 5 बाद 351 धावांचा डोंगर रचला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर शुभमन व इशान यांनी 19.4 षटकांत 143 धावांची तडाखेबंद शतकी भागीदारी साकारत भक्कम पाया रचला; तर पंड्या, सॅमसन यांनी त्यावर सोनेरी कळस चढवला.

प्रारंभी, इशान व शुभमन यांनी प्रारंभापासूनच फटकेबाजीवर भर दिला आणि एकदा जम बसल्यानंतर जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा सिलसिलाच सुरू केला. इशानच्या खेळीत 8 चौकार व 3 षटकार, तर शुभमनच्या खेळीत 11 चौकारांचा समावेश राहिला. या उभयतांच्या फटकेबाजीसमोर विंडीजच्या एकाही गोलंदाजाकडे काहीच प्रत्युत्तर नव्हते. अखेर 20 व्या षटकात इशान किशन कॅरियाहच्या गोलंदाजीवर समोर सरसावत उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक शाय होपकरवी यष्टिचित झाला आणि विंडीजला मोठा दिलासा लाभला. ऋतुराज गायकवाड आल्यापावली बाद झाला. मात्र, संजू सॅमसन व त्यानंतर हार्दिक पंड्या या उभयतांनी तडाखेबंद अर्धशतके झळकावत विंडीजच्या जखमेवर जणू आणखी मीठ चोळले. सॅमसनने नंतर शेफर्डच्या गोलंदाजीवर मिडऑफवरील हेटमेयरकडे सोपा झेल दिला.

विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई

शुभमन गिल चौथ्या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी भारताने 38.4 षटकांत 4 बाद 244 धावांपर्यंत मजल मारली होती. सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या सूर्यकुमार यादवने 30 चेंडूंत 2 चौकार, 2 षटकारांसह जलद 35 धावा केल्या. नंतर तो डावातील 47 व्या षटकात शेफर्डच्या गोलंदाजीवर बाद झाला. बॅकवर्ड पॉईंटवरील कॅरियाहने डावीकडे झेपावत अप्रतिम झेल टिपला आणि यामुळे सूर्याची खेळी झाकोळली गेली. नेतृत्वाची धुरा हाताळत असणारा हार्दिक पंड्या 52 चेंडूंत 70 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या आक्रमक खेळीत 4 चौकार व 5 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. रवींद्र जडेजा 7 चेंडूंत 8 धावांवर नाबाद राहिला. विंडीजच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाची या लढतीत चांगलीच धुलाई झाली. रोमारिओ शेफर्डने 2 बळी घेतले. मात्र, यासाठी त्याला 10 षटकांत तब्बल 73 धावा मोजाव्या लागल्या. अल्झारी, मॉटी व कॅरियाह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news