पिंपरी-चिंचवड शहरातील तारांगणमध्ये एकाच क्लिपमुळे वैताग | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरातील तारांगणमध्ये एकाच क्लिपमुळे वैताग

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड शहरात चिंचवड येथील सायन्स पार्क येथे असणार्‍या तारांगणला 16 मेपासून जुलै महिन्यात 29 हजार नागरिकांनी भेट दिली आहे. 15 मे रोजी तारांगणचे उद्घाटन झाले. तेव्हापासून तारांगणमध्ये दररोज तारांगण पाहण्यास गर्दी होत आहे. मात्र, एकच क्लिप वारंवार दाखविण्यात येत असल्याने पाहणार्‍यांची निराशा होत आहे. सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगणमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत दररोज सहा शो होत आहेत.

तारांगणमध्ये आकाशमालेतील ग्रहांच्या माहितीच्या 12 क्लिप्स उपलब्ध आहेत. मात्र, मे महिन्यापासून मद सनफ नावाची एकच क्लिप वारंवार दाखविण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबाबरोबर, मित्र – मैत्रिणीबरोबर पुन्हा येणारे आणि यावेळी दुसरे काहीतरी पहायला मिळेल या आशेने आलेल्यांची निराशा होत आहे.

तारांगणातील शो हा ग्रुपमध्ये दाखविला जातो. एकावेळी 120 जण तारांगणचा शो पाहू शकतात. ऑप्टोमेकॅनिकल व डीजीटल पद्धतीच्या माध्यमातून हायब्रिड प्रोजेक्शन पद्धतीचे अत्याधुनिक तारांगण विकसित केलेले आहे. तारांगण प्रकल्प दोन हजार 410 चौरस मीटर क्षेत्रफळात विकसित करण्यात आलेला आहे.

पहिला शो सकाळी 11 वाजता सुरू होतो. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमधून हे शो दाखविले जातात. सध्या शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्रातील विविध भागातील मुले तारांगण व सायन्स पार्क पाहण्यासाठी येत आहेत. त्यावेळी एकच क्लिप सुरु असल्याने दुसर्‍यांदा पाहणार्‍यांची निराशा होत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या क्लिपपैकी काहीतरी वेगळे दाखवावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

हेही वाचा

पुणे : आराखड्यांत अडकला वित्त आयोगाचा निधी

डांबरात चिकटली कुत्री; अग्निशमन जवानांनी केली प्रयत्नाची शर्थ

लवंगी मिरची : ऐतिहासिक भेट

Back to top button