कोल्हापूर : धरणातील पाण्याचे प्रमाण कसे मोजतात? | पुढारी

कोल्हापूर : धरणातील पाण्याचे प्रमाण कसे मोजतात?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सध्या पावसाळा सुरू असून सगळीकडे पाऊस आणि पाण्याचीच चर्चा सुरू आहे. अमूक धरणात एवढा टीएमसी पाणीसाठा झाला, तमूक धरणातून एवढ्या क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशा बातम्या कानावर पडत आहेत; पण पाण्याच्या या मोजमापाबद्दल सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ आहे, तर चला जाणून घेऊ पाण्याच्या मोजमापाबद्दल…

पाणी मोजण्याचे दोन प्रकार आहेत. पाणी स्थिर असेल म्हणजे ते एखाद्या तलावात किंवा धरणात असेल, तर ते पाणी घनफूट, घनमीटर, दशलक्ष घनमीटर आणि अब्ज घनफूट या परिमाणात मोजले जाते. पाणी वाहते असेल, तर ते क्यूसेक या परिमाणात मोजले जाते.

1 क्यूसेक म्हणजे एक घनफूट. एक फूट बाय एक फूट बाय एक फूट आकाराच्या भांड्यात जेवढे पाणी बसेल इतके. 28.317 लिटर पाणी म्हणजे एक क्यूसेक. कोयना धरणातून 1 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला, याचा अर्थ धरणातून प्रत्येक सेकंदाला 28 हजार 317 लिटर पाणी सोडले जात आहे.

1. एक क्यूमेक म्हणजे एक घनमीटर प्रतिसेकंद. लिटरमध्ये 1000 लिटर पाणी. धरणातून 1 हजार क्यूमेक पाण्याचा विसर्ग, याचा अर्थ धरणातून सेकंदाला 10 लाख लिटर पाणी सोडले जात आहे.

2. छोटी धरणे, बंधारे आणि तलावातील स्थिर पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये मोजला जातो. एक घनमीटर म्हणजे 1000 लिटर. या हिशेबाने एक दशलक्ष घनमीटर म्हणजे 100 कोटी लिटर.

3. मोठ्या धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये मोजला जातो. एक टीएमसी म्हणजे 2831 कोटी 68 लाख 46 हजार 592 लिटर. 5 लाख लोकसंख्येला वर्षभर पुरुन 100 कोटी लिटर शिल्लक राहते.

4. महाराष्ट्राची लोकसंख्या 14 कोटींच्या दरम्यान आहे. एवढ्या लोकसंख्येला वर्षभर पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी 270 टीएमसी पाणी लागते.

5. राज्यात 139 मोठी, 260 मध्यम आणि 2,591 लहान अशी 2990 धरणे आहेत. सवार्ंची मिळून पाणी साठवण क्षमता 48017.62 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 1695.71 टीएमसी आहे.

6. धरण, तलाव, नद्या, पाऊस आणि भूगर्भातील पाणीसाठा याचा विचार केला, तर राज्याला प्रतिवर्षी जवळपास 5 हजार टीएमसी पाणी उपलब्ध होते. अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण फार मोठे आहे.

Back to top button