पुणे : सराईत गुन्हेगार हद्दपार | पुढारी

पुणे : सराईत गुन्हेगार हद्दपार

धायरी/पुणे : पुढारी वृत्तसेवा : 

सिंहगड रोड परिसरातील नांदेडमधील तिघे सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी पुणे शहर, जिल्हा, पिंपरी येथून हद्दपार करण्यात आले आहेत. तुषार ऊर्फ सोन्या कोळाप्पा धोत्रे (19), मोग्या ऊर्फ शुभम गुंजाळ (19), सागर विठ्ठल दांगडे (20) या तिघांना हवेली पोलिस ठाण्याच्या वतीने हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर बेकायदा गर्दी जमवून मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे, जबरी चोरीचा प्रयत्न करणे, असे गुन्हे हवेली पोलिस ठाणे व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांना पुणे शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी हवेली पोलिस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 प्रमाणे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांना प्रस्ताव देण्यात आला होता. यामुळे या टोळीला सहा महिन्यांसाठी पुणे शहर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. या तिघांपैकी तुषार धोत्रे व शुभम गुंजाळ यांना हवेली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना हद्दीच्या बाहेर सोडण्यात आले. यापैकी सागर दांगडे हा फरार असून, कोणास आढळल्यास हवेली पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी मित्तल यांनी केले आहे.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी अनमोल मित्तल, पोलिस हवालदार दिनेश कोळेकर, नीलेश राणे, संतोष तोडकर, मुंढे यांच्या पथकाने कारवाई केली.

हे ही वाचा :

पर्वती बनली धोकादायक ! खडक होतोय जीर्ण-शीर्ण; डोंगर घुशींनी पोखरला

सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड दुरुस्तीचे अर्ज आता ऑनलाईन

 

Back to top button