खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने मुठा नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. नदीपात्रातील धोकादायक पाण्यात उतरून शेकडो पर्यटक हुल्लडबाजी करत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. धरणातील वेगाने वाहणार्या नदीपात्रात पोहताना अनेक जणांचे बुडून मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. असे असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक हुल्लडबाजी करत आहेत.
सलग सुट्यांमुळे शनिवारी (दि. 29) चौपाटी, नदीपात्रासह परिसरात हजारो पर्यटकांची वर्षाविहारासाठी झुंबड उडाली होती. धरणातून दुपारी तीन वाजता पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला. जीवितहानी टाळण्यासाठी नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाने केले असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करत नदीपात्रात शेकडो हुल्लडबाज पर्यटकांनी गर्दी केली होती. पाटबंधारे विभागाकडून वारंवार सायरन वाजवून नागरिकांना पात्राच्या बाहेर होण्याच्या सूचना केल्या. परंतु, पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
सांडव्यात कमी प्रमाणात पाणी सोडले जात असले तरी नदीपात्रात वेगाने पाणी वाहत आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, यासाठी बसविण्यात आलेल्या जाळ्या तुटल्या आहेत. तुटलेल्या लोखंडी जाळ्यातून पर्यटकांनी नदीपात्रात धाव घेतली. सायंकाळी शेकडो पर्यटकांनी नदीपात्रात गर्दी केली होती. या ठिकाणी पाण्यात वाहून जाण्याचा धोका आहे. असे असले तरी तेथे खडकवासला जलसंपदाचे सुरक्षा तसेच पोलिस ही नसल्याने महिला, मुले, तरुण निसरड्या खडकांच्या नदीपात्रात उभे राहून मोबाईलमध्ये फोटो, चित्रीकरण करत होते. काही तरुण डबक्यात उतरून पोहण्याचा आनंद साजरा करत होते.
धोकादायकपणे नदीपात्रात मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहून धरणावरील सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. त्यांनी पोहणार्या पर्यटकांना बाहेर काढले. मात्र, अनेक हुल्लडबाज डबक्यात ठाण मांडून होते ते बाहेर आले नाहीत.
खडकवासला जलसंपदा विभागाच्या कार्यकारी
अभियंता श्वेता कुर्हाडे म्हणाल्या, तुटलेल्या संरक्षक जाळ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच धोकादायक पात्रात पर्यटक उतरू नये यासाठी आवश्यक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, उत्तमनगर पोलिसांनीही सांडव्यातील नदीपात्रात धाव घेतली. धरण भरून वाहत असल्याने पर्यटकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हवेली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम म्हणाले, धरणाच्या सांडव्या खालील पुलाच्या अलीकडे हवेली पोलिसांची हद्द आहे. सांडव्यासह नदीपात्र उत्तमनगर पोलिसांच्या हद्दीत आहे. नदीपात्रात कोणी उतरू नये यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी तीन वेळा सायरन वाजवले जात आहे. असे असले तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पर्यटक धोकादायक नदीपात्रात उतरून हुल्लडबाजी करत आहेत. खडकवासला धरणावर दहा सुरक्षा रक्षक तैनात केल्याने धरणात उतरणार्या हुल्लडबाजांना चाप बसला आहे. मात्र, मृत्यूचे आगार असलेल्या नदीपात्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
हेही वाचा :