पुणे : समाविष्ट गावांतील कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ!

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : दुसर्या टप्प्यात महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या खडकवासला, किरकटवाडी, नांदेडसह 23 गावांतील 454 कर्मचार्यांना प्रशासनाने अद्यापही सुधारित वेतनश्रेणी लागू केली नाही. ग्रामपंचायत काळातील तुटपुंज्या वेतनामुळे या कर्मचार्यांवर उपासमारीची कुर्हाड कोसळली आहे. दोन वर्षांपासून कर्मचारी महापालिकेच्या वेतनश्रेणीची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, प्रशासकीय लालफितीच्या कारभारामुळे त्यांना अद्यापही वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही.
30 जून 2021 रोजी शासनाच्या अधिसूचनेनुसार ग्रामपंचायत कर्मचार्यांचा महापालिका सेवेत समावेश करण्यात आला. हे सर्व कर्मचारी नियमित आहेत. बोगस कर्मचारी भरती प्रकरणाशी त्यांचा संबंध नाही. याबाबत प्रशासकीय पडताळणी होऊनही या कर्मचार्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. सर्वांत कमी वेतन नांदोशी, खडकवासला, किरकटवाडी, न्यू कोपरे आदी गावांतील कर्मचार्यांना आहे. दरमहा 5 ते 16 हजार रुपये इतके वेतन या कर्मचार्यांना मिळत आहे. त्यात घरभाडे, वीज, रेशनिंगही भागत नाही.
लोकसंख्या वाढल्यामुळे ग्रामपंचायत काळापेक्षा अधिक काम त्यांना करावे लागत आहे.
कर आकारणी, नोटिसा बजावणे, करवसुली, अनधिकृत बांधकामाची पाहणी, सफाई, पाणीपुरवठा, दिवाबत्ती अशी कामे त्यांना करावी लागत आहेत. किरकटवाडीतील लक्ष्मण सातपुते, सतीश गब्दुले, सागर रिंढे, प्रसाद सोनवणे आदी कर्मचार्यांनी याबाबत व्यथा मांडल्या. महापालिकेचे स्वतंत्र विभाग असल्याने कामाचा ताणही वाढला. तुटपुंज्या पगारात सर्व कामे त्यांना करावी लागत आहेत.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन 23 गावांतील कर्मचार्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. वेतनश्रेणीच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी विशेष सहायक नियुक्त केले आहेत.
हेही वाचा :
एटीएसने रत्नागिरीतून एकाला उचलले ; दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप