यत्र तत्र सर्वत्र…खड्डेच खड्डे ! आणि महापालिका म्हणते, फक्त 444 खड्डे !! | पुढारी

यत्र तत्र सर्वत्र...खड्डेच खड्डे ! आणि महापालिका म्हणते, फक्त 444 खड्डे !!

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य असताना महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीमध्ये शहरात केवळ 444 खड्डेच दुरुस्त करणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, खड्डे दुरुस्त करण्यासाठी
पथ विभागाकडून 35 ते 40 कोटी आणि 15 क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रत्येकी 1 कोटीप्रमाणे 15 कोटी खर्च होणार आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांवरून महापालिका आयुक्तांनी पथ विभागाचे कान टोचून आठवडाभरात खड्डे दुरुस्त न केल्यास संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

या इशार्‍याला आठवडा झाला तरी शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मध्य शहराच्या तुलनेत उपनगरांमधील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून, सिग्नलवर हजारो वाहने अडकून पडत आहेत.

खड्डे दुरुस्तीसाठी करावा लागतो कोट्यवधींचा खर्च
महापालिकेच्या पथ विभागाकडे रस्ते दुरुस्ती वाहन अर्थात रोड मेन्टेनन्स व्हेईकल या 15 गाड्या आहेत. या प्रत्येक गाडीसाठी दरवर्षी दीड कोटी रुपये खर्च येतो. याशिवाय सध्या सुरू असलेल्या समान पाणीपुरवठा योजना आणि सांडपाणी वाहिन्यांच्या कामानंतर रस्ते दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वर्षभरात पथ विभागातर्फे रस्ते दुरुस्ती व खड्ड्यांसाठी 35 ते 40 कोटी रुपये खर्च केले जातात. याशिवाय क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी 10 टन याप्रमाणे 150 टन माल दररोज दिला जातो. क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये याप्रमाणे दरवर्षी 15 कोटी रुपये दिले जातात. त्यामुळे दरवर्षी सुमारे 55 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ही केवळ खड्डे दुरुस्तीवर खर्च होणार आहे.

शहरात समान पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन यासाठी खोदकाम सुरू आहे. याशिवाय एटीएमएस सिग्नल यंत्रणा, खासगी कंपन्यांचे खोदकाम व अन्य खोदकामे केली गेली. जिथे खोदकाम झाले, तिथेच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात त्याची तात्पुरती दुरुस्ती करून पावसाळ्यानंतर रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण केले जाईल.
                                              व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, महापालिका

दीड महिन्यात आढळले  17 हजार खड्डे
या पार्श्वभूमीवर एक जून ते 26 जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत शहरात तब्बल 17 हजार 193 खड्डे आढळून आले व त्यापैकी 16 हजार हजार 747 खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे, तर उर्वरित 444 खड्डे लवकरच बुजविण्यात येणार असल्याचेही पथ विभागाने स्पष्ट केले आहे.

खड्डे बुजविण्यासाठी पालिका वापरते चक्क मुरूम, खडी

बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून मुरूम आणि खडीचा वापर केला जात आहे. परिणामी, मुरूम टाकल्यामुळे परिसरात चिखल होत आहे. दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजस सोसायटीजवळील चौकात मोठमोठे खड्डे पडले असून, या ठिकाणी कलवडचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. खड्डे बुजवण्यासाठी डांबर, सिमेंट काँक्रीट, पेव्हिंग ब्लॉगचा वापर करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन मात्र हे खड्डे योग्य पद्धतीने दुरुस्त करण्यापेक्षा केवळ मुरूम आणि खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करत आहे. मुरूम टाकल्यामुळे रस्त्याच्या त्या भागात चिखल होत आहे. त्यामुळे मुरमाचा चिखल आणि खडीवरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहे.

हेही वाचा :  

पुणे : स्वमान्यतेसाठी अकराशे शाळांची नोंदणी

Pune Metro : दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनानंतर 2 तासांत होणार प्रवासी सेवा सुरू

Back to top button