Pune Metro : दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनानंतर 2 तासांत होणार प्रवासी सेवा सुरू | पुढारी

Pune Metro : दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनानंतर 2 तासांत होणार प्रवासी सेवा सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  येत्या 1 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटन झाल्यानंतर 2 तासांतच प्रवाशांना पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील मार्गावरून थेट प्रवास करता येणार आहे. यात महत्त्वाचे म्हणजे मेट्रोकडून शाळकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना तिकीटदरात सवलत देण्यात येणार आहे. महामेट्रो प्रशासनाने यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

या वेळी मेट्रोचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे उपस्थित होते. या वेळी त्यांनी दुसर्‍या टप्प्यातील गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकापर्यंतचा मार्ग खुला करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने भूमिगत असलेल्या सिव्हिल कोर्ट स्थानकाची उपस्थित पत्रकारांना माहिती दिली. या स्थानकाचे काम पूर्ण झाले असून, यात जाण्यासाठी 8 लिफ्ट आणि 18 एस्केलेटर आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करणे सोपे होणार आहे.
अशी मिळणार तिकीटदरात सूट

महामेट्रोकडून दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. उद्घाटनानंतर दोन्ही टप्प्यांवर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना तिकीटदरात 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी तिकीटदरात सूट मिळणार आहे. तसेच, कार्डधारकांनासुध्दा सवलत देण्याचे मेट्रोकडून नियोजन करण्यात आले आहे.

असे आहेत तिकीटदर…
पुण्यातील सुरू झालेला मार्ग – 10 पासून 35 रुपयांपर्यंत
पिंपरीतील सुरू झालेला मार्ग – 10 पासून 25 रुपयांपर्यंत

हेही वाचा :

Back to top button