पुणे : स्वमान्यतेसाठी अकराशे शाळांची नोंदणी | पुढारी

पुणे : स्वमान्यतेसाठी अकराशे शाळांची नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे स्वमान्यतेसाठी 1 हजार 136 शाळांनी नोंदणी केली आहे. जिल्हा परिषदेने स्वमान्यतेची नवीन प्रणाली विकसीत केली आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन करून क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र देण्यास जिल्हा परिषदेने सुरुवात केली आहे. अकराशे शाळांपैकी 151 शाळांनी प्रमाणपत्रासाठी पैसे देखील जिल्हा परिषदेला वर्ग केले आहेत.
पुण्यात काही शाळा बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सुरू असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे स्वमान्यता या ऑनलाइन प्रणालीद्वारेच देण्याचा निर्णय झाला. तसेच क्यूआरकोडमुळे बनावट प्रमाणपत्र तयार होणार नसल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे. खासगी शाळांना दर तीन वर्षांनी स्वमान्यता देण्यात येते.

त्यासाठी आता जिल्हा परिषदेने ई-मान्यता प्रणाली विकसीत केली आहे. पुण्यातील 2 हजार 800 हून अधिक शाळा ई-मान्यता मिळण्यास पात्र आहेत. त्या सर्व शाळांना क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. परिणामी जिल्हा परिषदेचेदेखील उत्पन्न वाढत आहे. आतापर्यंत तीन लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील सर्व खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना दर तीन वर्षांनी स्वमान्यता प्रमाणपत्र देण्याचे काम जिल्हा परिषद करते. पुणे शहरातील काही शाळा या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. म्हणून जिल्हा परिषदेने ई-मान्यता प्रणाली कार्यान्वित करून शाळांनाही ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वमान्यतेसाठी ऑनलाइन पद्धतीने शाळांनी एकदा माहिती भरल्यानंतर पुन: पुन्हा माहिती भरण्याची गरज नाही. शाळांना फाईलच नसल्याने त्या गहाळ होण्याचे प्रकारदेखील घडणार नाहीत. याशिवाय हे सर्व नागरिकांना पाहण्यासाठी वेबसाईटवर खुले असणार आहे. अकराशे शाळांनी नोंदणी केली आहे.
                               – संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. 

हेही वाचा :

शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी घालावी; युनेस्कोचे आवाहन

Kolhapur Panchganga water level | कोल्हापूर जिल्ह्यात संततधार कायम, पंचगंगेची पाणी पातळी ४१ फुटांवर

Back to top button