

नानगाव : पुढारी वृत्तसेवा : अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळी आश्चर्ये पाहावयास मिळत असतात आणि आपण ते जाऊन नक्की पाहत असतो. असेच एक आश्चर्य दौंड तालुक्यातील वाळकी (संगमबेट, ता. दौंड) येथे दिसून येत आहे. या ठिकाणी मुळा-मुठा व भीमा नदीच्या पाण्याचे वेगवेगळे प्रवाह नदीच्या संगमतीरी दिसून येत असून, हे नयनरम्य दृश्य मन मोहून टाकणारे आहे. येथील वाळकी (संगमबेट) येथे पुण्याच्या बाजूने वाहणारी मुळा-मुठा नदी, तर भीमाशंकर भागातून वाहणारी भीमा नदी या दोन नद्यांचा संगम होत असून, खाली पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथून पुढे ही भीमा नदी म्हणून ओळखली जाते.
सध्या डोंगर भागात पावसाची रिपरिप सुरू असल्याने या भागातून खाली वाहणार्या नद्यांचा पाणीपातळी हळूहळू वाढत असते तर कधी कमी होत असते. पाऊस पडल्यावर नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते. दोन्ही नद्यांचे जोरदार वाहणारे पाण्याचे प्रवाह एकत्रितपणे वाळकी (संगमबेट) येथे पाहावयास मिळतात. मात्र, हे प्रवाह येथे एकमेकांमध्ये मिसळत नसून ते या ठिकाणी वेगळे दिसतात. मुळा-मुठा नदीपात्रातील पाणी काळसर रंगाचे दिसते, तर भीमा नदीचे पाणी पांढरट गढूळ रंगाचे दिसते. हे दोन्ही वेगळे प्रवाह संगमबेट येथे वेगवेगळे दिसून येतात.
या ठिकाणी दिसणारे दोन्ही नद्यांचे वेगवेगळे व आश्चर्यकारक दृश्य खूपच मनमोहक दिसून येते. संगम होणार्या ठिकाणी हे पाणी एकत्रित मिसळत नसल्याने खाली वाहणारा पाण्याचा प्रवाह थोड्या अंतरापर्यंत वेगळा दिसून येतो. म्हणजे, हे दोन्ही नद्यांचे पाणी एकत्रितपणे मिसळत नसल्याचे दिसून येते. हे दृश्य खूपच मनमोहक व नयनरम्य आहे.
हेही वाचा :