अघोरी कृत्य करणार्‍या भोंदूबाबाची ग्रामीण भागात दहशत | पुढारी

अघोरी कृत्य करणार्‍या भोंदूबाबाची ग्रामीण भागात दहशत

कुरकुंभ : नागरिकांना अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी यश येते, तर कधी अपयश येते, यश येण्यासाठी बराच कालावधीही लागतो. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या प्रकाराला अंधश्रद्धेचे रूप देऊन भोंदूबाबांनी पैसे कमविण्याचा धंदा सुरू केला आहे. वारंवार येणारे अपयश, शारीरिक समस्या नसून साडेसाती लागली आहे. लवकरात लवकर उपाय न केल्यास साडेसाती तुमची पाठ सोडणार नाही. अशी भीती घालून राजरोसपणे लुबाडण्याची भोंदूबाबांची दुकाने काही भागात राजरोसपणे सुरू आहेत. या दुकानात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते. भोंदूगिरीतून आघोरी पूजा, विधी केल्या जातात. यात अशिक्षित व शिक्षित असे अनेकजण फसले असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत कोणी खुलेआम बोलण्यास तयार होत नाही. भोंदूबाबाच्या कृत्याबद्दल गोपनीयता बाळगली जात असून, याबद्दलची माहिती बाहेर दिल्यास कुटुंबावर वाईट परिणाम होतील, अशी भीती घातली जाते. त्यामुळे अनेकजण गपगार आहेत. याचा फायदा होत असल्याने भोंदूगिरी करणार्‍यांचे फावले आहे.

पूजा विधीच्या माध्यमातून बांधणी करून देतो, त्यानंतर काही दिवसात पुन्हा सुखाचे दिवस येतील, असे आमिष दाखवून भोंदूबाबा लोकांना जाळ्यात ओढत आहेत. करणी, उतारा, बांधणी, वारंवारचे अपयश यावर उपाय म्हणून कोंबडा, अंडी, बकर्‍याचे मुंडके, नारळ, हळद, कुंकू, हार, फुले, टाचण्या लावलेले लिंबू, विद्रूप केलेला फोटो आदी वस्तू एकत्रित काळ्या कपड्यात बांधून रात्रीच्या सुमारास उतारा म्हणून फेकला जातात. स्मशानभूमी, नदी पात्रालगत, तलाव, ओढा, एकत्रित येणारे रस्ते, रेल्वे लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, भुयारी मार्ग, अपघातस्थळी अशा विविध ठिकाणी असे उतारे सतत्याने पडलेले दिसून येतात. यासाठी मोठ्या रकमा उकळल्या जातात. काळा दोरा, नारळ, अगरबत्तीची राख, लिंबू, कापडात बांधून उशाला ठेवण्यासाठी, घरात बांधण्यासाठी दिल्या जातात. शारीरिक वेदना, एखादा अपघात कौटुंबिक वाद, घरगुती आर्थिक अडचणी, समस्या, अपयश, यावर उपाय करून देण्यासाठी पैशाची मागणी होते. अशा भोंदूबाबा विरोधात तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्याने पोलिस ठाण्यात या तक्रारी नसल्यासारख्याच आहेत. त्यामुळे भोंदूबाबांवर कारवाई होणार कशी असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातले समस्याग्रस्त ग्रामीण भागात
काही मोठ्या शहरातून ग्रामीण भागातील भोंदूबाबाकडे समस्या घेऊन येण्याचे प्रमाण वाढत आहे. भोंदूबाबाकडून बंद खोलीत हात चलाखीने काही आघोरी प्रकार केला जातो. यातून विशेषतः महिलांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर पूजा, विधी, यावर चर्चा केली जाते.

हेही वाचा :

Maharashtra government | खासगी एजन्सीमार्फत सरकारी कंत्राटी नोकरीच्या निर्णयाला स्थगिती, राज्य सरकारचा निर्णय

अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्यांसाठी पीक स्पर्धा

Back to top button