पुणे : ‘उड्डाण’अंतर्गत 15 विमानसेवा सुरू करणार | पुढारी

पुणे : ‘उड्डाण’अंतर्गत 15 विमानसेवा सुरू करणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत देशभरातील विविध शहरांत स्टार एअरलाइन्सतर्फे 15 विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे. सद्य:स्थितीत आमच्या 18 विमानसेवा सुरू आहेत. यातील 15 उड्डाण योजनेअंतर्गत, तर 03 नॉर्मल मार्ग आहेत, अशी माहिती संजय घोडावत समूहाचे प्रमुख संजय घोडावत यांनी बुधवारी दिली. स्टार एअरलाइन्सकडून नुकतीच पुणे-बंगळुरू व्हाया हैदराबाद अशा विमानसेवेला सुरुवात झाली. त्याची माहिती देण्यासाठी पुणे विमानतळावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूर शहरातून आम्ही विमानसेवेला सुरुवात केली.

कोल्हापूर येथून सुरू असलेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीकडे सध्या 7 विमाने आहेत. आणखी दोन नवीन विमाने येणार आहेत. सध्या स्टार एअरलाइन्सचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. ते पुण्यात स्थलांतरित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही घोडावत यांनी या वेळी सांगितले. या वेळी घोडावत म्हणाले, सुरुवातीपासून पुणे शहराशी माझा जवळचा संबंध आहे. पुणे ही माझी सासरवाडी आहे. पाचवीत शिक्षण घेत असताना स्वत:चे विमान असावे, असे स्वप्न मी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर येथून विमानसेवेला सुरुवात केली. सद्य:स्थितीत 18 शहरात आम्ही विमानसेवा सुरू केली आहे. बंगळुरू आणि आसाम येथे आमची हेलिकॉप्टर सेवा सुरू आहे.

पुण्यातून इंदोर, जोधपूर विमानसेवा
स्टार एअरलाइन्सचा विस्तार करण्याच्या दृष्टीने येत्या काळात पुण्यातून इंदोर आणि जोधपूर येथे विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. स्टार एअरलाइन्सला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने कोरोना काळातही कंपनी फायद्यात राहिली. कोल्हापूर येथून हैदराबाद, तिरुपती, मुंबई, बंगळुरू विमानसेवा सुरू आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत आणखी काही शहरासाठी विमानसेवा सुरू करण्यात येईल.

पुणे ते बंगळुरू व्हाया हैदराबाद सेवा
पुणे-बंगळुरू व्हाया हैदराबाद विमानसेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान पुणेकरांना मिळणार आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान संध्याकाळी पावणेसात वाजता विमान उड्डाण घेणार असून, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी ते विमान हैदराबाद येथे उतरेल. त्यानंतर रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी तेच विमान बंगळुरूकडे उड्डाण घेईल आणि रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी बंगळुरू येथे पोहोचेल. तसेच बंगळुरू येथून सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि संध्याकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी हैदराबाद येथे लँड होईल, तेथून संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी उड्डाण घेईल आणि संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पुण्यात उतरेल. या मध्यमातून पुणेकरांना हैदराबाद आणि बंगळुरू या दोन शहरांसाठी स्वस्त दरात विमानसेवा देण्याचा मानस असल्याचे मत स्टार एअरलाइन्सच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

Back to top button