गोंदियातून एका संशयिताला ताब्यात ; एटीएस प्रमुख पुण्यात तळ ठोकून | पुढारी

गोंदियातून एका संशयिताला ताब्यात ; एटीएस प्रमुख पुण्यात तळ ठोकून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) पकडण्यात आलेल्या दोघा दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडे मिळून आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या परीक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने एटीएसने गोंदिया येथून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याने या दोघा दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याला एटीएसचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.

राज्यात विविध ठिकाणी एटीएसच्या पथकाने या गुन्ह्याच्या अनुषंगाने झाडाझडती सुरू केली आहे. त्याच चौकशीसाठी काहींना ताब्यात घेतले असल्याचीदेखील माहिती आहे. दरम्यान दाते यांनी बुधवारी दिवसभर एटीएसच्या कार्यालयात तळ ठोकला होता. त्यांनी शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडून या दोघांबाबत केलेल्या तपासाची माहिती घेतली. सुरुवातील कोथरूड पोलिसांनी अटक केल्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.

नंतर दोन दहशतवाद्यांचा ताबा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घेतल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीचा आढावा एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनी बुधवारी प्रत्यक्ष एटीएस कार्यालयाला भेट देऊन घेतला. या वेळी त्यांच्याकडून सर्व बाजूंनी गुन्ह्याचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले. मोहंमद युनूस महंमद याकू साकी (वय 24) आणि मोहंमद इम—ान महंमद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) यांना अटक केली आहे. एका पेन ड्राईव्हमधून धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनी बुधवारी पुणे एटीएस कार्यालयात बैठक घेतली. या वेळी दाते यांनी पुणे पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. गुन्ह्याचा तपास सुरू असून, तपासात सर्व बाजू पडताळल्या जात आहेत.

हेही वाचा :

Uddhav Thackeray : सरकार मजबूत असताना राष्ट्रवादी का फोडलीत? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

Back to top button