पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी ; दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड | पुढारी

पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी ; दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा तसेच कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपूर्वी या दोघांना चार बुरखाधारी व्यक्ती भेटल्याचे समोर आले होते. त्याच व्यक्तींनी या दोघांना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाची चाचणी घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दोघांनाही विशेष सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 5 ऑगस्टपर्यंत ‘एटीएस’ कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोहम्मद युनूस महम्मद याकू आणि मोहम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. कोंढवा) अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13, 16 ब, 18 आणि 20 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. नुकताच गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून ‘एटीएस’कडे वर्ग करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांच्या पथकाने मागील सोमवारी मध्यरात्री दुचाकी चोरीच्या संशयातून त्यांना पकडले होते. त्यांचा साथीदार व म्होरक्या महम्मद शहनवाज आलम (31) पसार झाला आहे.

त्याचा शोध ‘एटीएस’, ‘एनआय’ व पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. दरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने ‘एटीएस’ने दोघांना न्यायालयात हजर केले. तेव्हा ‘एटीएस’ने एका पेनड्राईव्हमधील माहिती न्यायालयात दिली आहे.
पुणे पोलिसांना त्यांच्याकडे एक पेनड्राईव्ह, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वस्तू तसेच पांढर्‍या पावडरच्या गोळ्या आढळून आल्या होत्या. हा तपास सुरू असतानाच त्यांच्याकडे दुसर्‍या खोलीत आणखी एक लॅपटॉप सापडला.

त्यातील एक पेनड्राईव्ह ‘एटीएस’च्या हाती लागल्यानंतर मिळालेल्या माहितीचा अहवाल ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केला. यावेळी केलेल्या तपासाबाबत ‘एटीएस’ने कमालीची गोपनीयता बाळगली. दरम्यान, ‘एटीएस’च्या तपासात सापडलेली ती पांढर्‍या गोळ्यांची पावडर ही स्फोटक असल्याचे एक्स्प्लोजिव्ह वेफर डिटेक्टरमध्ये स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ही पावडर नेमके कोणते स्फोटक आहे, हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपास करण्यासाठी पाठविली असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

पेनड्राईव्हमधील माहिती स्फोटक
तपासात दोघांनी पुणे, सातारा व कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्यांनी या बॉम्बस्फोटाची चाचणी नेमकी कोणत्या ठिकाणी घेतली, याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आढळलेल्या एकाच पेनड्राईव्हमधील ही माहिती असल्याचे ‘एटीएस’कडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. तसेच, त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक साहित्यात सिमकार्ड, हार्डडिस्क, टॅब, लॅपटॉप मिळाला असून, त्यामधील माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आणखी माहिती उघड होणार आहे.

घातपाताचे प्रशिक्षण घेतले
दहशतवाद्यांनी घातपातासाठी आवश्यक असलेले सर्व पातळ्यांवरचे प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली. त्यांनी रेकी करणे, त्यानंतरचे नियोजन आणि कृती करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेतले आहे. ते त्यांनी कुठे घेतले व त्यांना ते कोणी दिले, याबाबत तपास सुरू केला आहे.

मृत्यूचीही पर्वा नाही
धर्मातील पवित्र गोष्टींसाठी जीव गेला, तरी ते करण्यासाठी त्यांची तयारी होती. त्यानुसार त्यांचे ब्रेन वॉश करण्यात आले होते. घातपातासाठी दहशतवादी विचारधारा स्वीकारण्यापासून प्रशिक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई करेपर्यंतच्या सर्व पातळीवरचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. दरम्यान, त्यांनी आखलेला प्लॅन आणि रेकी केल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. त्यांच्याकडून नकाशेही जप्त केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

पंचगंगा पातळीत वाढ; स्थलांतर सुरू

Team India Performance : टीम इंडियाला विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून काय मिळाले?

Back to top button