पंचगंगा पातळीत वाढ; स्थलांतर सुरू | पुढारी

पंचगंगा पातळीत वाढ; स्थलांतर सुरू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मंगळवार दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून, अनेकांनी स्थलांतर सुरू केले आहे. संभाव्य पूरबाधित 27 गावांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलावरील वाहतूक दुसर्‍या दिवशीही बंदच होती. पन्हाळा तालुक्यातील नावली पैकी धारवाडी परिसरात डोंगर खचल्याने 60 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत पाणी पातळीत दोन इंचांनी वाढ झाली. यामुळे पंचगंगेची पातळी कमी होण्याऐवजी धोका पातळीकडे जात आहे. मंगळवारी दुपारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. शहर आणि परिसरात तर पावसाची रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होती. यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे.

राधानगरी धरण मंगळवारी रात्री 97 टक्के भरले होते. पावसाचा जोर वाढला, तर बुधवारी पहाटे धरण पूर्ण क्षमतेने भरून त्याचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. यासह पंचगंगा नदीपात्रात पाणी येणार्‍या कुंभी, कासारी धरणांतूनही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचगंगेची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

धरणातून विसर्ग सुरू झाला, पावसाचा जोरही कायम राहिला; तर पाणी पातळीत सात ते आठ फुटांपर्यंत वाढीची शक्यता असल्याचे सांगत नागरिकांनी आतापासूनच सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी सकाळी केले. यामुळे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांत दिवसभर भीतीचे वातावरण होते. दिवसभर नागरिकांत पाणी पातळीचीच चर्चा सुरू होती. पावसाचा जोर वाढल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा ते कोल्हापूरच्या दिशेने येणार्‍या सेवा मार्गावर पाणी साचले होते.

अनेक जण एकमेकांकडे पाणी पातळी किती आहे, किती वाजेपर्यंत किती पाणी वाढेल आदीची विचारणा करत होते. सोशल मीडियावरही हीच चर्चा सुरू होती. काही ठिकाणी पूरबाधित नागरिकांनी साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी दिवसभर सुरू केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासह उद्योग भवनमधील तळ मजल्यावरील शासकीय कार्यालय स्थलांतरित करण्यास सुरुवात करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संभाव्य पूरबाधित 27 गावांतील शाळांना सुट्टी दिली आहे. या शाळांचा वापर तात्पुरते निवारा केंद्र म्हणून करण्यात येणार असून, गावातील पूरबाधितांचे या ठिकाणी स्थलांतर केले जाणार आहे. जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली असून, 66 मार्ग बंद आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पाच पक्की घरे पूर्णत:, तर 16 पक्क्या आणि 55 कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत वारणा धरण वगळता उर्वरित 14 प्रमुख धरण परिसरात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक 222 मि.मी. पाऊस पाटगाव धरण क्षेत्रात झाला. राधानगरी परिसरात 114 मि.मी., तुळशीत 108 मि.मी., दूधगंगेत 81 मि.मी., कासारीत 91 मि.मी., कडवीत 115 मि.मी., कुंभीत 113 मि.मी., चिकोत्रात 98 मि.मी., चित्रीत 88 मि.मी., जंगमहट्टीत 70 मि.मी., घटप्रभेत 179 मि.मी., जांबरेत 200 मि.मी., आंबेओहोळमध्ये 82 मि.मी., तर कोदे परिसरात 119 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 25 मि.मी. पावसाची नोंद झाली.

Back to top button