गडकोटांवर सुरक्षा व्यवस्थेचा अभाव; सिंहगड, राजगड परिसरात दरडींचा धोका | पुढारी

गडकोटांवर सुरक्षा व्यवस्थेचा अभाव; सिंहगड, राजगड परिसरात दरडींचा धोका

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत, तर दुसरीकडे गडकोटांवर पुरेशा सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसामुळे सिंहगड घाट रस्ता, तसेच राजगडावर दरडी कोसळण्याचा धोका असल्याने पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे (भांबुर्डा) वन विभागाच्या वतीने सिंहगड घाट रस्त्यावरील धोकादायक दरडीच्या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या वन कर्मचार्‍यांसह सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अतिवृष्टीत राजगडावर दरडींचा धोका असल्याने वेल्हे तालुका तहसीलदार दिनेश पारगे यांनी पुरातत्व विभाग व पोलिस विभागाला पत्र देऊन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची सूचना दिल्या आहेत. सोमवारी तहसीलदार पारगे यांनी तोरणागडाच्या पायथ्याला पर्यटकांशी संवाद साधला.

या वेळी चोरगे या पर्यटकाने तोरणागडावर अवघड ठिकाणी रेलिंग नसल्याने दुर्घटनांची भीती व्यक्त केली. पानशेत येथे गेल्या 24 तासांत विक्रमी 105 मिलिमीटर पाऊस पडला. गडकोटांच्या खोर्‍यात संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्या ओढे नाले दुथडी भरून आहेत. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. दुसरीकडे गडकोटावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. राजगडावर पुरातत्व विभागाचे दोन पाहरेकरी व दोन खासगी सुरक्षारक्षक, तर तोरणागडावर एक पाहरेकरी व दोन खासगी सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अपुरी पडत आहे.

पर्यटकांनो साहसी क्रीडा करू नका !

सिंहगड, राजगड, तोरणा खोर्‍यात सध्या पाऊस सुरू आहे. यामुळे गडकोटांवरील तटबंदी, बुरुज निसरडे झाले आहेत. डोंगरकड्यातील निसरडे धबधबे, गडकोटांवर साहसी क्रीडा करू नये, असे आवाहन पर्यटकांना करण्यात आले आहे.

सिंहगड, राजगड, तोरणागडासह संरक्षित गडकोटांवर विनापरवाना गिर्यारोहक, पर्यटकांनी दोरखंडाच्या साह्याने (रॅपलिंग) चढाई करू नये. गडकोटांवर पावसाळ्यात साहसी खेळांना मनाई करण्यात आली आहे.

-डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्त्व विभाग

राजगडावर दरडी कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे पर्यटकांनी पुरातत्त्व विभागाने मनाई केलेल्या भागात जाऊ नये. वेल्हे हा डोंगरी दुर्गम तालुका आहे. सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पर्यटकांनी तोरणागड व इतर भागांत आवश्यक खबरदारी घ्यावी.

-दिनेश पारगे, तहसीलदार, वेल्हे तालुका

हेही वाचा

नाशिक : पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्तांची उचलबांगडी

गडहिंग्लज : भडगाव पूल, जरळी बंधार्‍यावरील वाहतूक सुरु

वडगाव शेरी : विमाननगरचे डीपी रस्ते खुले होणार कधी ?

Back to top button