वडगाव शेरी : विमाननगरचे डीपी रस्ते खुले होणार कधी ? | पुढारी

वडगाव शेरी : विमाननगरचे डीपी रस्ते खुले होणार कधी ?

माउली शिंदे

वडगाव शेरी(पुणे) : महापालिकेने विमाननगरमधील 1987च्या ‘डीपी’मधील काही रस्ते 34 वर्षांनंतरदेखील वाहतुकीसाठी खुले केले नाहीत. यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. यामुळे या भागातील सर्व डीपी रस्ते वाहतुकीसाठी खुले कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विमाननगर येथील निको गार्डन, फिनिक्स मॉल समोर, दत्त मंदिर चौक, साकोरे नगर आणि विमानतळ रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

साकोरेनगर आणि सिंम्बॉयसिस कॉलेज या चौकामध्ये संध्याकाळी पाचशे मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. विमाननगरमधील सध्याच्या रस्त्यांना अंतर्गत पर्यायी रस्ता असता, तर मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाला असता. परंतु, गेल्या 34 वर्षांपासून महापालिकेने विमाननगरमधील सर्वे नं. 230 अ, 229, 226, 203 आणि 228 मधील डीपी रोड विकसित करून वाहतुकीसाठी खुले केले नाही.याबाबत पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, विमाननगरमधील किती डीपी रस्ते बंद आहेत, त्या रस्त्याची काम का झाली नाही, रस्त्याची जागा ताब्यात घेण्याबाबत काय निर्णय झाला होता, याबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. (समाप्त)

मोबदल्याअभावी कामे रखडली

महापालिका प्रशासनाने जागा मालकाला मोबदला न दिल्यामुळे रस्ते रखडले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विमाननगर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेने जागा मालकाच्या मागण्या मान्य करून तत्काळ रस्ता बनवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

विमाननगरमधील डीपी रस्ते किरकोळ तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. महापालिकेने रस्त्यांबाबत जागामालकांशी संवाद करून यावर तोडगा काढला पाहिजे. डीपी रस्ते बंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जटील होत चालली आहे.

– उध्दव गलांडे, शहर उपसंघटक, शिवसेना

डीपीमधील हे रस्ते बंद

नगर रोडपासून साकोरेनगरवरून स्केटिंग ट्रकला जाणारा रस्ता, सर्वे नं. 230 अ विमानतळ रोड ते विमाननगर, म्हाडा कॉलनी ते विमाननतळ रस्ता, राजीव नगर ते विमानतळ रस्ता, गंगापूर ते विमानतळ रस्ता हे डीपीमधील रस्ते अनेक वर्षांपासून बंद आहेत.

विमाननगर फिनिक्स मॉल ते स्केटिंग ट्रकला जाणारा बंद आहे. तसेच खराडी दर्गा ते लोहगाव जाणार्‍या रस्त्याचे पाचशे मीटरचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.

Back to top button