अभियांत्रिकी, विधी, एमबीएलाच डिमांड; व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती | पुढारी

अभियांत्रिकी, विधी, एमबीएलाच डिमांड; व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती

गणेश खळदकर

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून राबविण्यात येणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी, विधी, फार्मसी, एमबीए आणि बीएड याच अभ्यासक्रमांकडे जास्त कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनानंतर व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती असून, तत्काळ नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थी अभ्यासक्रमांना पसंती देत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

सध्या राज्यात इंडस्ट्री 4.0 चे वारे वाहत आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांकडून कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे चित्र दिसून येत आहे. सीईटी सेलने दिलेल्या आकडेवारीनुसार, अभियांत्रिकीसाठी यंदा तब्बल 1 लाख 72 हजार 163 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 56 हजार 474 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज पूर्ण केले आहेत.

यंदा पहिल्यांदाच अभियांत्रिकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याचे स्पष्ट झाले आहे. विधी तीन वर्षांसाठी 51 हजार 360 आणि पाच वर्षांसाठी 14 हजार 278, अशा एकूण 65 हजार 638 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दोन्ही अभ्यासक्रमांसाठी 60 हजार 167 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज पूर्ण केले आहेत. शिक्षकभरती रखडलेली असताना विद्यार्थ्यांनी यंदा बीएड अभ्यासक्रमांना पसंती दिली आहे. बीएडसाठी 50 हजार 934 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 46 हजार 846 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज पूर्ण केले आहेत.

एमबीए, एमएमएससाठी 59 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 50 हजार 736 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज पूर्ण केले आहेत. तर बी. फार्मसीसाठी 54 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 46 हजार 341 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज पूर्ण केले आहेत. त्यामुळे ठरावीक अभ्यासक्रमांनाच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या देशात इंडस्ट्री 4.0 चे वारे वाहत आहे. त्यासाठी कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची गरजच आहे. त्याचबरोबर कोरोनानंतर विद्यार्थ्यांचा कल तत्काळ नोकरी देणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वाढलेला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, विधी, फार्मसी, एमबीएलाच महत्त्व दिल्याचे दिसत आहे. यातूनच येत्या काळात इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे.

उध्दव सिद,,संचालक, अ‍ॅडमिशन विभाग,
झील एज्युकेशन सोसायटी, पुणे

हेही वाचा

पुणे मेट्रोची दुसर्‍या टप्प्यातील स्थानके तयार

नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 26 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Back to top button