अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 26 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश | पुढारी

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 26 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीत 25 हजार 973 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, त्यातील 19 हजार 682 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. आता प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून 27 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी (दि.24) जाहीर करण्यात आली. 326 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 15 हजार 950 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 99 हजार 846 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर विशेष फेरीसाठी 28 हजार 963 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्याचे दिसून आले. विशेष फेरीत त्यापैकी 25 हजार 973 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला.

प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 हजार 682 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, 3 हजार 424 विद्यार्थ्यांना दुसर्‍या, तर 1 हजार 217 विद्यार्थ्यांना तिसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळा वरील त्यांच्या लॉगइनद्वारे प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन हा पर्याय निवडून प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे उपसंचालक कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष फेरीत पहिल्यांदाच सर्वाधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. त्यामुळे या फेरीत सर्वाधिक प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विज्ञान शाखेत सर्वाधिक प्रवेश

विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेसाठी जाहीर करण्यात आले आहेत. विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी तब्बल
14 हजार 134 विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखा 9 हजार 47 आणि कला शाखेतील 2 हजार 154 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.

प्रवेशाचा 51 हजारांचा टप्पा पार

अकरावी प्रवेश प्रक्रियेत तीन फेर्‍यांमध्ये 44 हजार 114 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, तर विशेष फेरीच्या पहिल्याच दिवशी 7 हजार 120 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशात 51 हजारांचा टप्पा पार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अकरावी प्रवेशाच्या 1 लाख 15 हजार 950 जागा आहेत. त्यापैकी कोटा आणि कॅप मिळून 51 हजार 234 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी अद्यापही 64 हजार 716 जागा उपलब्ध आहेत.

हेही वाचा

चिनी कंपनीचा वाहननिर्मितीचा प्रकल्प फेटाळला

पुणे : शासकीय रुग्णालयांत आयव्हीएफ उपचारांचा अभाव

पुणे मेट्रोची दुसर्‍या टप्प्यातील स्थानके तयार

Back to top button