माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाठ; आदिवासींच्या व्यवसायावर गदा | पुढारी

माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाठ; आदिवासींच्या व्यवसायावर गदा

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील निसर्गरम्य माळशेज घाटातील विलोभनीय दृश्य डोळ्यांत साठविण्यासाठी कोसळणार्‍या धबधब्यांखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी दर वर्षी पावसाळ्यात पर्यटक माळशेज घाटात गर्दी करीत असतात. मात्र, ठाणे जिल्हाधिकारी यांनी या वर्षी मनाई आदेश लागू केल्याने पर्यटकांनी घाटाकडे पाठ फिरविल्याने या भागातील आदिवासींच्या पावसाळी व्यवसायावर गदा आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशामुळे टोकावडे (जि. ठाणे) पोलिस स्टेशनच्या वतीने खडा पहारा देण्यात येत आहे. टोकावडे पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सुमारे 18 पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी चोख बंदोबस्त बजावत आहेत.धोकादायकपणे पर्यटन करणार्‍या लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे, इकडे घाट चढून आल्यावर ओतूर पोलिस स्टेशनची हद्द सुरू होते, ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी अप्रिय घटना टाळण्यासाठी डोळ्यांत तेल घालून खडा पहारा देत आहेत.

अलीकडे माळशेज घाट परिसर अपघाती क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे. यावर्षी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता ठाणे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत. याचाच परिणाम म्हणून घाटात शुकशुकाट दिसून येत आहे, पर्यटकांनी यंदा माळशेज घाटाकडे पाठ फिरविल्याने येथील आदिवासी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे,आदिवासींचा पावसाळी रोजगार पूर्णपणे कोलमडला आहे.

पर्यटनस्थळी नशेबाज तरुणांचा धुडगूस ही चिंतेची बाब आहे, भरीस भर म्हणून धोकादायक क्षेत्रात नको ते स्टंट करणारे महाभाग पर्यटनाला गालबोट लावताना आढळत आहेत, अपघातांना आपसूकच निमंत्रण मिळत असल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी यांनी मनाईचे आदेश पारित केले आहेत. मात्र, पर्यटकांच्या संख्येत अचानक मोठी घट झाल्याने दुर्गम पट्ट्यातील आदिवासींचा व्यवसाय कोलमडल्याने ते हवालदिल झाले आहेत.

अत्यल्प भांडवलात सुरू केलेल्या व्यवसायातून सुमारे रोज 500 रुपये मिळतात,आता घाटात पर्यटक फिरकत नसल्याने व्यवसाय नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

विठ्ठल पारधी,
व्यावसायिक, माळशेज घाट.

मनाई आदेशाचा पर्यटनावर विपरीत परिणाम झाला असून, आमचे सर्व व्यवसाय बंद पडून आदिवासींचा पावसाळी रोजगार बुडून उपासमारीची वेळ आली आहे.

जगन कोकणे, आदिवासी व्यावसायिक,माळशेज घाट.

हेही वाचा

पुणे : रानडे ट्रस्टच्या 16 एकरांवर जावई-मेहुण्याने लावली स्वतःची नावे!

जयंत पाटील-तटकरेंच्या भेटीची चर्चा

ठाकरेंच्या काळात विरोधकांना एक पैसा मिळाला नाही : देवेंद्र फडणवीस

Back to top button