ठाकरेंच्या काळात विरोधकांना एक पैसा मिळाला नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

ठाकरेंच्या काळात विरोधकांना एक पैसा मिळाला नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : निधीवाटपावरून उडालेल्या राजकीय भडक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांनाच फटकारले. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडला. त्यांच्यावेळी विरोधकांना एक फुटकी कवडी निधी मिळाला नाही, असे टीकास्त्र फडणवीसांनी डागले. त्याचवेळी तुम्ही कसेही वागला असाल, तरी आम्ही मात्र कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

विरोधकांना निधी दिला जात नसल्याच्या मुद्द्यावर आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. शिंदे-फडणवीस सरकार असमान पद्धतीने निधीवाटप करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला; तर निधीवाटपातील सापत्न व्यवहार महाराष्ट्रात यापूर्वी घडला नसल्याचे सांगत निधीवाटपातील असमानतेचा मुद्दा निकाली काढावा, अशी मागणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी, निधीच्या बाबतीत कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नसल्याचे सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो; पण निधीवाटपावरून एकदाही चर्चा या सभागृहात झाली नाही; कारण तशी वेळच आली नाही.

मेरिटच्या आधारावर स्थगिती उठवली

याच अर्थसंकल्पात काँग्रेसच्या आमदारांनासुद्धा आम्ही निधी दिला आहे. काँग्रेसच्या किमान 15 आमदारांच्या निधीवरील स्थगिती उठवली, काहींना दीडशे कोटींपर्यंतचा निधी मिळाला. मेरिटच्या आधारावर स्थगिती उठविल्याचे फडणवीस म्हणाले. निधीवाटपावरून विरोधी पक्षनेत्यांनी जे शहाणपण आम्हाला शिकवले ते तेव्हाच्या सरकारमध्ये शिकवले असते, तर ही वेळ आली नसती, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

Back to top button