

माउली शिंदे
वडगाव शेरी(पुणे) : गेल्या दहा वर्षांमध्ये नगर रोड परिसरातील लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परंतु, या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार झालेला नसल्याने नगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. खराडी शिवणे नदीपात्रातील रस्ता गेल्या 12 वर्षांपासून कागदावर आहे. नदीपात्रातील रस्ता पूर्ण केल्यास नगर रोडवरील खराडी ते येरवडादरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यामध्ये शिवणे ते खराडी परिसरातील नदीकाठचा 22.50 किलोमीटरचा रस्ता करण्याचा प्रस्ताव होता. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यासाठी महापालिकेने 2011मध्ये 356 कोट रुपयांची निविदा काढली होती. या रस्त्याचे काम शिवणे ते म्हात्रे पूल (6 कि.मी), म्हात्रे पूल ते संगमवाडी (5 किमी) आणि संगमवाडी ते खराडी (11.50) किमी, असे एकूण तीन टप्प्यांमध्ये 'डिफर्ट' पध्दतीने करण्यात येणार असून, तो रस्ता 100 फुटी असणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूला पदपथ, सायकल ट्रॅक, सबवे आदी कामांचा समावेश आहे.
तीन वर्षांमध्ये हा रस्ता तयार करण्याचे नियोजन होते. मात्र, रस्त्यासाठी भूसंपादनाचे वेळेवर झाले नाही. यामुळे या कामाला अनेकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. जवळपास बारा वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या तिसर्या टप्प्यातील खराडी ते संगमवाडी या 11.5 किलोमीटर रस्त्यापैकी जवळपास 6 किलोमीटर रस्त्यासाठी जागेचे भूसंपादनाचे झाले आहे. यापैकी 5 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादन अद्याप झाले नसल्याने हे काम रखडलेले आहे.
खराडी ते संगमवाडी या टप्प्यातील 1.2 किलोमीटरचे भूसंपादन रखडले आहे. या रस्त्यासाठी 356 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत 140 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची कामे झाली असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
नगर, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, लोणीकंद, वाघोली, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, विमाननगर या भागातील नागरिक नगर रोडचा वापर करतात. या रस्त्याला पर्यायी मार्ग नाही. रस्त्यावर वाहनाची संख्या वाढली. पण, रस्ता वाढला नाही. यामुळे रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती.
पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. नदीपात्रातील रस्ता झाल्यास वाहतुकीची समस्या सुटेल शिवणे ते खराडी परिसरातील नदीकाठी 22.50 कि.मी. रस्ता प्रस्तावित या रस्त्याचे काम तीन टप्प्यांत होणार असून, तो 100 फुटी असणार दोन्ही बाजूला पदपाथ, सायकल ट्रॅक, सबवे आदींचा समावेश.
हेही वाचा