राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त शैलजा दराडे निलंबित | पुढारी

राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त शैलजा दराडे निलंबित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने पैसे घेऊन नोकरी न लावता उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त तथा प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव टि. वा. करपते यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

शिक्षण विभागात नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी बारा ते पंधरा लाख रुपये घेऊन तब्बल 44 उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शैलजा दराडे (रा. पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध 22 फेब—ुवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, दराडे यांनी पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने 29 एप्रिल 2023 रोजी हा अर्ज फेटाळला होता. दरम्यान, शिक्षण आयुक्तालयाने दराडे यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासाही मागवला होता. त्यावर त्यांनी म्हणणे सादर केले होते.

त्यानंतर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित प्रकरणी 7 जुलै 2023 रोजी राज्य शासनाला सविस्तर अहवाल सादर केला होता. यानुसार दराडे यांनी केलेली कृती ही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे नमूद झाले. त्याची दखल घेऊन दराडे यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश टि. वा. करपते यांनी नुकतेच दिले आहेत.

निलंबित असताना दराडे यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. त्यांना खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय ठरणार नाही. तसे केल्यास त्या गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरणार आहेत, असेही आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा

पिंपरी : बनावट औषधांबाबत एफडीएची कारवाई

विकास निधीत पुण्याचे आमदार मालामाल

मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी येथे दरड कोसळली; ३ तास वाहतूक राहणार बंद

Back to top button