

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दरडी कोसळत असल्याने सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाने लावलेले बॅरिकेड्स तोडून रविवारी सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटकांनी राजगडाच्या बालेकिल्ल्यावर धाव घेतली. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्षाविहारासाठी सकाळपासून राजगडासह तोरणागडावर गर्दी केली होती. सिंहगड, तसेच खडकवासला धरण चौपाटी, पानशेत परिसरही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
राजगडावर शनिवारी (दि. 22) दरड कोसळल्याने बालेकिल्ल्याचा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केला होता. मात्र, रविवारी सकाळी बॅरिकेड्स तोडून पर्यटकांनी बालेकिल्ल्यावर धाव घेतली. पहारेकरी बापू साबळे म्हणाले, की काही पर्यटकांनी दांडगाईने बॅरिकेड्स तोडल्या. विनवण्या करूनही पर्यटक ऐकत नाहीत.
सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी झाल्याने दुपारी साडेबारा वाजता गडावरील वाहनतळ भरून गेले होते. घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोलमडली. त्यामुळे दुपारी एक ते दोनपर्यंत घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. टप्प्याटप्प्याने पर्यटकांना गडावर सोडण्यात आले. दिवसभरात गडावर जाणार्या वाहनचालकांकडून सुमारे एक लाख रुपयांचा टोल वन खात्याने वसूल केला.
पुरातत्व विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तसेच दरडी कोसळत असल्याने बालेकिल्ला बंद करण्यात आल्याचे फलकही गडासह गुंजवणे व पाल खुर्द मार्गावर लावले नाहीत. त्यामुळे बालेकिल्ला बंद असल्याची माहिती मिळत नाही. यामुळे परिसरात सूचना फलक लावण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.
सिंहगडावर पर्यटकांची दिवसभरात 363 चारचाकी व 1073 दुचाकी वाहने आल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण चौपाटीच्या परिसरात पर्यटकांची गर्दी झाल्याने पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा