पिंपरी : लहान मुलांमध्ये डोळ्यांची साथ नियंत्रणात | पुढारी

पिंपरी : लहान मुलांमध्ये डोळ्यांची साथ नियंत्रणात

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आळंदीत लहान मुलांमध्ये डोळ्यांची साथ आली असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र महापालिकेच्या मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात दिवसाला तीन ते चार मुलांनाच हा आजार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांमध्ये देखील डोळ्यांच्या साथीच्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्या तरी शहरामध्ये लहान मुलांमध्ये डोळ्यांची साथ नियंत्रणात आहे.

आळंदीमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. आळंदीतील विविध संस्थांमध्ये राहणार्‍या मुलांचे सर्वाधिक प्रकरणे यामध्ये समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबतची माहिती जाणून घेतली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा नेत्र रोग विभाग मासूळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात स्थलांतरित केलेला आहे. मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयात सध्या दिवसाला डोळ्यांच्या विविध आजाराचे 150 ते 175 रुग्ण तपासण्यासाठी येत आहेत. त्यामध्ये डोळ्यांची साथ असलेल्या रुग्णांचे प्रमाण केवळ 8 ते 10 इतकेच आहे. तर त्यामध्ये 3 ते 4 लहान मुलेच डोळ्यांच्या साथीवरील उपचारासाठी तपासण्यासाठी येत आहेत, अशी माहिती मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयातील विभाग प्रमुख व प्रा. डॉक्टर रूपाली महेशगौरी यांनी दिली.

प्रमुख लक्षणे काय?
डोळे लाल होणे
डोळ्यातून चिकट घाण येणे
काय काळजी
घ्यायला हवी?
डोळ्यांच्या साथीची लागण झालेल्या रुग्णाने वारंवार हात धुवावे.
एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचा टॉवेल वापरू नये.
वारंवार चेहर्‍याला हात लावणे टाळावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप घ्यावे.
स्वतःच्या मनाने औषधे घेतल्यास त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो.

महापालिकेच्या मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात डोळ्यांच्या साथीवरील उपचारासाठी दररोज तपासण्यास येणार्‍या रुग्णांचे प्रमाण सध्या खूपच अत्यल्प आहे. आळंदीत डोळ्यांची साथ आली असल्याने तेथे वैद्यकीय उपचारासाठी मागणीनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.

– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता,
महापालिका वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था.

हेही वाचा

Monsoon Session : मणिपूर हिंसाचारावरून आज पुन्हा संसदेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

सातारा : पश्चिम भागात दरडींचा धोका; ‘इर्शाळवाडी’नंतर तरी वाई प्रशासनाला जाग येणार का?

Back to top button