लोणावळा : शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करा; तहसीलदार यांच्या अधिकार्‍यांना सूचना

लोणावळा : शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करा; तहसीलदार यांच्या अधिकार्‍यांना सूचना
Published on
Updated on

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे झाडे पडणे, घरे पडणे, शेती पिकांचे नुकसान असे प्रकार घडल्यास तात्काळ त्यांचा पंचनामा करण्याच्या सूचना मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

लोणावळा व परिसरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शिवाय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात धोकादायक गाव म्हणून घोषित करण्यात आलेल्या 23 गावांपैकी मावळ तालुक्यातील आठ गावांना मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट दिली. तसेच, त्या ठिकाणच्या धोकादायक भागाची पाहणी केली.

धोकादायक गावाची माहिती पाठविण्याचे अधिकार्‍यांना सूचना

धोकादायक गावांमध्ये मावळ तालुक्यातील तुंगी आणि भुशी गावाचा समावेश आहे. तालुक्यातील पावसाची परिस्थिती बघता एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. या पत्रानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने धोकादायक म्हणून घोषित असलेल्या गावांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

तहसीलदार विक्रम देशमुख यांनी लोणावळा, तळेगाव नगर परिषद व वडगाव नगरपंचायत अधिकार्‍यांसह बांधकाम विभाग, महावितरण, महसूल विभाग, कृषी विभाग या सर्वांना पत्र देत आपल्या भागामध्ये पाहणी करून धोकादायक भागांची माहिती तहसील कार्यालयाला कळवण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

अधिकार्‍यांनी आपले कार्यक्षेत्र सोडून जाऊ नये

लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्या त्या भागातील सर्व सरकारी विभागातील अधिकार्‍यांनी आपले कार्यक्षेत्र सोडून जाऊ नये. तसेच, धोका लक्षात घेऊन सतर्क राहावे, अशा सूचना तहसीलदार यांनी केल्या आहेत. पाऊस व वारा यामुळे लाईटचे खांब पडणे, तारा तुटणे असे प्रकार घडल्यास तात्काळ दुरुस्ती करणे, पावसामुळे पूल वाहून जाणे, रस्ता खचणे असे प्रकार घडल्यास त्यावर ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news