रिमोल्ड टायरमुळे अपघातांना आमंत्रण..! | पुढारी

रिमोल्ड टायरमुळे अपघातांना आमंत्रण..!

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या मागच्या चाकाचे टायर रिमोल्ड करण्यात येते. मात्र रिमोल्ड केलेल्या टायरची वैधता तीस ते चाळीस हजार किमीपर्यंतच असते. त्यामुळे या टायरची नियमित तपासणी आवश्यक आहे. अन्यथा अपघातांना आमंत्रण मिळू शकते. गेल्या आठवड्यात औरंगाबाद-कोल्हापूर एसटीच्या मागील चाकाचे टायर फुटल्याने अपघात टळला. बसच्या मागे आणि समोर वाहन नसल्याने बसचा अपघात झाला नाही. अन्यथा प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली असती. यामुळे रिमोल्ड टायरची पाहणी दरवेळी एसटीच्या कार्यशाळेत केली जाते का नाही, याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे.

रिमोल्ड टायर : बसच्या पुढील चाकांच्या टायरची झीज झाल्यानंतर ते बदलण्यात येतात. त्यावर पुन:प्रक्रिया करून ते टायर मागील चाकांना बसविण्यात येतात.

रिमोल्ड टायर मागील चाकांनाच बसविले जाते :

स्टेरिंग असल्याने बसचा समतोल साधता यावा. म्हणून रिमोल्ड केलेले टायर मागील चाकांनाच बसविले जाते. टायर खराब झाले तरी प्रवासात अपघात टाळता येतो. मात्र पुढील बाजूस खराब टायर लावल्यास बसवर नियंत्रण ठेवणे चालकास त्रासाचे ठरते, परिणामी अपघात होण्याची दाट शक्यता असते.

रिमोल्ड टायरची वैधता

रिमोल्ड केलेल्या टायरची वैधता 30 ते 40 हजार किमीपर्यंत तर नवीन टायरची वैधता 50 ते 60 हजार किमी एवढी असते.
रिमोल्ड टायरबाबत घ्यायची काळजी
दरवेळी कार्यशाळेत तपासणी करणे, रिमोल्ड टायरमधून हवा पास होत असेल तर दुरुस्ती करणे, गॅप पडला असेल तर बदलणे आदींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Back to top button