चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर शहरापासून जवळ असलेल्या बल्लारपूर लगतच्या वर्धा नदीच्या पुलावर पुराचे पाणी आल्याने चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकानापासून राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती या तालुक्याचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली तरी, वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुराणे नदी काठावरील गावे व शेती प्रभावीत होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार सुरू असल्‍यामुळे नदी नाले भरभरून वाहत आहेत. लघु आणी मध्यम सिंचन प्रकल्प लोवरफ्लो झाल्याने त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच काल यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दिवसभराच्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातून बल्लारपूर शहराला लागून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बल्लारपूर लगतच्या वर्धा नदी पुलावर आज (रविवार) सकाळी साडेसातच्या वाजण्याच्या सुमारास पाणी आले आहे. त्यामुळे चंद्रपूर बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

लगतचे छोटे- मोठ्या नाल्यांवर पाणी आल्‍याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा आणि पैनगंगा ह्या दोन मोठ्या वाहणाऱ्या नद्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या काल दिवसभराच्या अतिवृष्टीमुळे दोन्ही नद्या प्रभावित झाल्या असून, लगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. याच नद्यांना लागून असलेले छोटे वाहणारे नाले प्रभावित होउन पाण्याखाली गेले आहेत. पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात हे मार्ग आहेत बंद

वर्धा आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद आहेत. त्यामध्ये आज सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर-राजुरा हा मार्ग बंद झाला. बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील विरुर स्टेशन लाठी मार्गांवरील पुलावर काल शनिवारी सायंकाळी पाणी आल्यामुळे हा मार्ग काल रात्रीच बंद झाला आहे. त्यामुळे नऊ गावांचा संपर्क तुटला आहे.

हडस्ती चारवठ मार्ग बंद झाला आहे. कोरपना तालुक्यातील भोयगाव धानोरा पुलावर 21 जुलै च्या रात्री पासूनच पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग तेव्हापासूनच बंद आहे. कोडसी पिपरी हा मार्ग ही बंद झाला आहे. अंतरगाव मध्ये काल रात्रीच पाणी शिरल्याने वनसडी अंतरगाव मार्ग बंद झाला आहे. महाराष्ट्र आणि आंध्र सीमेलगतच्या पारडी आणि खातेरा गावाच्या मधुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुरामुळे या मार्गावरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पारडी-खातेरा मार्ग बंद झाला आहे. पारडी चंद्रपूर तर खातेरा यवतमाळ हद्दीत आहे. त्यामुळे या भागातील दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा : 

Back to top button