

प्रसाद जगताप
पुणे : ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाकडून विभागातीलच 25 रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मेट्रो स्थानकांप्रमाणे रेल्वे स्थानकावर वापरात येणार्या विजेची मोठी बचत होणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत 72 छोटी-मोठी रेल्वे स्थानके आहेत. त्यात पुणे स्थानक आणि पिंपरी-चिंचवड कॉलनी स्ट्रीट लाइट, पिंपरी स्टेशन, सातारा ओएसएम डेपो, सातारा टीडीआर डेपो, सीडीओ कार्यालय घोरपडी यांसह अन्य काही ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
हे प्रकल्प 825 किलो वॅटचे असून, प्रत्येक प्रकल्पाद्वारे दिवसाला 3 ते 4 युनिट वीजनिर्मिती होते. याचे प्रमाण वाढून सर्व पुणे विभागातील स्थानके ग्रीन एनर्जीवर असावीत, याकरिता विभागातील पुणे-मिरज मार्गावरील 25 रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज रेल्वे पुणे विभागातील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता तरुण सुयल हे पाहतात.
पुणे विभारातील 72 रेल्वे स्टेशनचे विजेचे सरासरी बिल 1 कोटी 209 रुपये इतके येते. सध्या बसविण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे यामध्ये महिना 4 लाख 12 हजार रुपयांची बचत होते. आणखी 25 ठिकाणी प्रस्तावित असलेल्या स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यामुळे बचतीत वाढ होणार आहे.
वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली, नांद्रे, भिलवडी, किर्लोस्करवाडी, तकारी, भवानीनगर, कराड, शिरवडे, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, प्लासी, अडकरी, लोणंद, वाल्हे, दौंडज, जेजुरी, राजेवाडी, अंबले, शिंदवणे या स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे 270 किलो वॅटची वीजनिर्मिती होणार आहे.
ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमच्याकडील सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले आहे. कार्बन कमी करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात असून, आणखी 25 रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. हे प्रकल्प पुणे-मिरज मार्गावरील स्थानकांवर उभारण्यात येतील.
– डॉ. रामदास भिसे,
जनसंपर्क अधिकारी,
रेल्वे, पुणे विभाग
हेही वाचा