शेंडा पार्क रुग्णालयासाठी एशियन बँकेकडून कर्ज घेणार : हसन मुश्रीफ | पुढारी

शेंडा पार्क रुग्णालयासाठी एशियन बँकेकडून कर्ज घेणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शेंडा पार्क येथे स्वतंत्र रुग्णालय, विद्यार्थी व डॉक्टर्स वसतिगृह आणि अन्य इमारतीसाठी 872 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. यासाठी एशियन बँकेकडून कर्ज उपलब्ध करून लवकर रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुश्रीफ म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र 25 रुग्णालयांचा प्रस्ताव आहे. सीपीआरचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरतो. सीपीआरची इमारत जुनी आहे. तेथे अनेक अडचणी आहेत. जुन्या इमारतींची डागडुजी करण्यात येणार आहे. एशियन बँक व जायका यांच्याशी चर्चा सुरू आहे. रुग्णालय लवकरात लवकर सुरू करणे ही जबाबदारी आहे. 1100 खाटांचे रुग्णालय 596 कोटी, मुलांचे वसतिगृह 29 कोटी, परिचर्या केंद्रासाठी 24 कोटी, मुलांचे वसतिगृह 25 कोटी, फॉरेन्सिक लॅब 16 कोटी, डॉक्टर्स वसतिगृह 45 कोटी, महिला निवासी डॉक्टर्स वसतिगृह 45 कोटी असा एकूण 872 कोटींचा प्रस्ताव आहे. चार-पाच वर्षांत ही कामे पूर्ण होतील.

नवीन रुग्णालय करीत असताना सीपीआरमध्ये अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. अपघात विभागासमोर नवीन बांधकाम करून क्षमता वाढविण्यात येईल. सीपीआरमध्ये सीटी स्कॅन एमआरआय सुविधा उपलब्ध करू. जॉईंट रिप्लेसमेंट, कॅन्सर उपचाराची वानवा आहे. जॉईंट रिप्लेसमेंट सुरू केले जाईल. कॅन्सरबाबत आठवड्यातून एकदा शस्त्रक्रिया आणि ओपीडी सुरू केली जाईल. यासाठी डॉ. सुरज पवार यांचा प्रस्ताव आहे. तो मंजूर केला जाईल. नियोजनमधून दहा कोटी औषधे व दहा कोटी सर्जिकल साहित्यासाठी उपलब्ध होतात. त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांची कामे केली जातील. शवविच्छेदन इमारतीचे काम पूर्ण करून सर्व सुविधा दिल्या जातील. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा बांधता येते का याचा अभ्यास केला जाईल. सीपीआरमध्ये स्वच्छता राखली पाहिजे.

मुश्रीफ म्हणाले, कंत्राटी कर्मचार्‍यांना किमान वेतन मिळते का याची चौकशी करू. त्या चार महिला कंत्राटी कर्मचार्‍यांना पुन्हा नोकरीत घेण्यात येईल. क वर्गातील पदांसाठी परीक्षा झाली असून लवकरच त्यांना नियुक्ती पत्रे दिली जातील. ड वर्गातील पदे जिल्हाधिकार्‍यांच्या समितीमार्फत तत्काळ भरली जातील. एचएमआय सिस्टीम सर्व रुग्णालयात सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते.

472 प्राध्यापकांची भरती होणार

राज्यात 472 तर जिल्ह्यात 39 प्राध्यापक नेमले जातील. खासगी प्रॅक्टिसमध्ये जास्त पैसे मिळतात, म्हणून ते इकडे येत नाहीत. शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण घेणार्‍यांना पाच ते दहा वर्षांसाठी सक्ती करता येईल यासाठी कायदा करावा लागेल, असे मुश्रीफ म्हणाले.

Back to top button