सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या बैठकीत तीन सदस्यांना दाखविला बाहेरचा रस्ता! | पुढारी

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या बैठकीत तीन सदस्यांना दाखविला बाहेरचा रस्ता!

पुणे : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी कौटुंबिक संस्था होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या लढ्यास काहीअंशी यश आल्याचे दिसते. सदस्यांच्या एका मुलासह इतर दोघांचे सदस्यत्व काल झालेल्या (20 जुलै) संस्थेच्या प्रासंगिक बैठकीत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. लढ्यास प्राथमिक यश मिळाले असले, तरी अध्यक्ष आणि सचिवांच्या मुलांना मात्र मुदतवाढ देऊन विरोध करणार्‍या सदस्यांची समजूत काढण्यात संस्थेच्या पदाधिकार्‍यांना यश आल्याचे बोलले जात आहे.

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे मुख्यालय पुण्यात असून, दरवर्षी पदाधिकार्‍यांची जूनमध्ये वार्षिक सभा घेतली जाते. मागील दोन वर्षांपासून संस्थेतील गैरकारभारावर संस्थेतील वरिष्ठ सदस्यांनीच आक्षेप घेत प्रकरण धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयापर्यंत
नेले होते. नामदार गोखलेंनी स्थापन केलेल्या अशा मोठ्या संस्थेची बदनामी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला गेला.

जानेवारी 2023 मध्ये अध्यक्ष दामोदर साहू, सचिव मिलिंद देशमुख आणि वरिष्ठ सदस्य प्रेमकुमार द्विवेदी यांनी आपापल्या मुलांना, नातवाला संस्थेचे सदस्य करून घेण्यासाठी परस्पर बैठक घेऊन ठराव पास केला होता. ठराव आक्षेपार्ह नसला पाहिजे म्हणून प्रेमकुमार द्विवेदी यांनी त्यांचे संस्थेतील नातेवाईक असलेले अलाहाबाद शाखेचे सदस्य अमरीश तिवारी यांच्या मुलाला सदस्य म्हणून घेण्यासाठी त्यांना आपलेसे करून घेत सभेत कोरम नसतानाही ठराव पास करून घेतला, असे गंभीर आक्षेप असले तरी बैठकीत गोंधळ न होऊ देता त्यातील काही आक्षेपांस अध्यक्ष, सचिवांनी संमती देत होत असलेला विरोध क्षमविला.

अंडर ट्रेनिंग आणि प्रोबेशनरी सदस्यत्व…

मिलिंद देशमुख यांचे चिरंजीव चिन्मय देशमुख, अध्यक्ष यांचे चिरंजीव सुधांशु शेखर साहू आणि प्रेमकुमार द्विवेदी यांचे नातू प्रतीक पीयूष द्विवेदी यांना अंडर ट्रेनिंग सदस्यत्व; तर अमरीश तिवारी यांचे धाकटे चिरंजीव शैलेश तिवारी यांना प्रोबेशनवर घेतल्याचे दाखविले. सचिवांनी आणखी दोन डमी सदस्य शुभम जगताप, अमर हुले यांना घेतल्याचा ठराव पास करून घेतला होता. याबाबत वरिष्ठ सदस्य आत्मानंद मिश्रा यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

बैठकीत समजूत काढली…

तक्रारीनंतर 12 जून 2023 मध्ये धर्मदाय आयुक्तांनी मोठ्या संस्थेची बदनामी टाळण्यासाठी पुढाकार घेत सदस्यांना हा विषय आपसात मिटविण्याची सूचना केली होती. त्यानुसार 20 जुलै 2023 रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत देशमुख आणि दामोदर साहू यांनी त्यांच्या मुलांच्या सदस्यत्वाचा तात्पुरता कालावधी वाढवून घेतला आणि सदस्य कायम करून घेण्याचा ठराव मंजूर करून घेतला असल्याचे समजते, तर तक्रार करणार्‍या वरिष्ठ सदस्यांना आपल्या बाजूने वळवत त्यांची समजूत काढली असल्याचे समजते.

देशमुख भेटले, तर मिश्रांनी टाळले…

देशभर नाव असलेल्या संस्थेची बाजू यावी, यासाठी ’पुढारी’च्या प्रतिनिधीने सचिव मिलिंद देशमुख यांची भेट घेऊन पुण्यात होत असलेल्या बैठकीबाबत व सुरू असलेल्या न्यायिक प्रकरणावरून होत असलेल्या बदनामीविषयी बाजू घेण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी संस्थेच्या आवारात असलेल्या अमेय हॉटेलमध्ये भेट दिली. मात्र, केलेल्या तक्रारीवर मला काही बोलायचे नाही. तुम्ही बातम्या छापलेल्या आहेच.

तरी बैठकीत काहीतरी मार्ग काढला जाईल, असे सांगितले होते. देशमुख यांच्यासोबत वरिष्ठ सदस्य असलेल्या आणि तक्रारदार आत्मानंद मिश्रा यांनी देखील बाजू मांडण्यासाठी वेळ दिली होती. मात्र, त्यांनी वेळ देऊनही भेटण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, संस्थेतून काढलेले प्रवीणकुमार राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितले की, संस्था कौटुंबिक होऊ नये, यासाठी 15 मे 2023 रोजी धर्मदाय आयुक्त यांना नोंदणीकृत टपालाने माझी तक्रार पाठविलेली आहे.

‘पुढारी’च्या वृत्तानंतर यांना काढले बाहेर…

दैनिक ‘पुढारी’ने चालविलेल्या वृत्ताची दखल घेत बैठकीत काहीतरी केल्याचे दाखविण्यासाठी मिलिंद देशमुख यांनी आणलेले त्यांच्याच परिचयाचे डमी सदस्य म्हणून दाखविलेले शुभम जगताप, अमर हुले यांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांचे सदस्यत्व रद्द केले. या वेळी तानाजी गंभिरे यांना सदस्य होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून त्यांना बैठकीत बोलावले नाही. ज्याअर्थी त्यांचे नाव मागील ठरावात घेतले होते. आता शैलेश अमरीश तिवारी यांनासुद्धा षड्यंत्राने बाजूला करून चर्चेत असलेल्या वादाला तूर्ततरी पूर्णविराम दिल्याचे दाखविले. मात्र, पीयूष द्विवेदी याला अंडर ट्रेनिंग कायम करण्यात प्रेमकुमार द्विवेदी यांनी बाजी मारली.

हेही वाचा

मणिपुरात आणखी दोन महिलांची सामूहिक बलात्कार करून हत्या

इर्शाळवाडी दुर्घटना : आणखी 5 मृतदेह बाहेर काढले; 78 अद्याप बेपत्ता

चक्क साखर, पाणी आणि जीवाणूंपासूनही बनत आहे दूध!

Back to top button