इर्शाळवाडी दुर्घटना : आणखी 5 मृतदेह बाहेर काढले; 78 अद्याप बेपत्ता | पुढारी

इर्शाळवाडी दुर्घटना : आणखी 5 मृतदेह बाहेर काढले; 78 अद्याप बेपत्ता

खोपोली, पुढारी वृत्तसेवा : ज्या डोंगराने रोजगार दिला आणि आधार म्हणून उभा राहिला तोच डोंगर काळ बनून इर्शाळवाडीच्या मुळावर आला. त्या दुर्घटनेला आता तीन दिवस पूर्ण झाले आहेत. शनिवारी आणखी पाच मृतदेह हाती लागले, त्यामुळे मृतांची एकूण संख्या 27 इतकी झाली आहे. अजूनही 78 जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी तिसर्‍या दिवशी ढिगारे उपसण्याचे काम पुढे चालू ठेवले होते. सायंकाळी ही शोधमोहीम थांंबविण्यात आली.

इर्शाळवाडीच्या 48 घरांवर पडलेली दरड काढण्यासाठी आणखी बराच कालावधी लागणार आहे. शनिवारी दिवसभर ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी आणखी 7 मृतदेह बाहेर काढले. जवळजवळ 15 फुटांपर्यंत घरांवर दरड कोसळली आहे. ढिगार्‍याखाली घरांसह माणसेही अडकली होती. यातील माणसे जिवंत सापडण्याची आशा मावळली आहे. मात्र, तरीही मृतदेह शोधण्याचे काम पुढे सुरू राहणार आहे. शनिवारी दिवसभर सापडलेल्या 7 मृतदेहांपैकी तिघांची ओळख पटली आहे. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत 1 ते 18 वयोगटातील 31 मुले व मुली होत्या. त्यातील 21 जण आश्रमशाळेत शिक्षण घेत होते. दुर्घटनेत सापडलेल्यांमध्ये लहान मुले व वयोवृद्ध यांची संख्या मोठी आहे.

सध्या मदतकार्य ‘एनडीआरएफ’ टीमकडून सुरू आहे. आता या भागाचा ताबा ‘एनडीआरएफ’कडे आहे. या बेसकॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा वगळता नागरिक, पर्यटक, ट्रेकर्स यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सापडलेल्या 7 मृतदेहांपैकी पाच जणांची ओळख पटली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे, पिंकी संदेश पारधी (वय 25), नांगी किसान पिरकड (50), कृष्णा किसान पिरकड (27), भारती मधू भुतांबरा (22), हिरा मधू भुतांबरा (16). उशिरा मिळालेल्या आणखी दोन मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Back to top button