‘ते’ दहशतवादी होते ड्रोनद्वारे पुण्याच्या चित्रीकरणाच्या तयारीत; एनआयएकडून चौकशी | पुढारी

‘ते’ दहशतवादी होते ड्रोनद्वारे पुण्याच्या चित्रीकरणाच्या तयारीत; एनआयएकडून चौकशी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील संवेदनशील ठिकाणांचे ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे चित्रीकरण करण्याच्या तयारीत दहशतवादी होते असा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) असून, याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. शहरात घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍यांचे साहित्य जप्त केले आहे. तर दुसरीकडे या दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी घरे भाड्याने घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही दोन्ही घरे कोंढवा परिसरातील आहेत. दुसर्‍या घरातून पोलिसांनी आणखी एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. दोघांकडे सापडलेल्या साहित्यातून ते बाँब तयार करण्यातही एक्स्पर्ट असल्याचे समोर आले आहे.

कोथरूड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा त्यांचा डाव होता, असे ’एनआयए’च्या तपासात आढळून आले आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्या पसार झालेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24), मोहम्मद इम—ान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) हे दोघे जण कोथरूड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. गस्त घालणार्‍या पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

इम—ान खान, युनूस साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढर्‍या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह महत्त्वाच्या लष्करी तसेच संशोधन संस्था आहेत. शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या तयारीत दहशतवादी होते असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

खान आणि साकी यांच्याकडून पांढर्‍या रंगाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून , गोळ्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षापासून दहशतवादी कोंढवा भागात वास्तव्यास होते. घरमालकाने त्यांच्या भाडेकराराची नोंदणी केली नसल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

दोन ठिकाणी घरे भाड्याने

पकडण्यात आलेले दोघे दहशतवादी आणि फरारी असलेला आलम या तिघांनी कोंढवा परिसरात दोन ठिकाणी घरे भाड्याने घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तेथे पोलिसांना आणखी एक लॅपटॉप आणि मोबाईल सापडला आहे. त्यामुळे मोठी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

तपास ’एटीएस’कडे

कोथरूड पोलिसांनी दोघा दहशतवाद्यांना पकडल्यानंतर आता गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) वर्ग करण्यात आला आहे. शहर पोलिस दलालीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी एटीएसच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दोघा दहशतवाद्यांची कसून चौकशी केली. दोघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचे परीक्षण केल्यानंतर मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने एटीएसचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाँब बनवण्यातही ’ते’ दोघे एक्स्पर्ट

म्हणून मुंबईतून मुक्काम पुण्यात
साकी आणि खान हे दोघे एनआयएच्या रेकॉर्डवरील पाच लाखांचे बक्षीस असलेले दहशतवादी आहेत. एनआयएच्या छाप्यानंतर रतलाम – मध्य प्रदेश येथून फरार झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला मुंबईतील भेंडीबाजार परिसरात वास्तव्य केले. मात्र, मुंबईत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या जाळ्याची त्यांना भीती वाटत होती. एकेदिवशी आपण पकडले जाऊ याची धास्ती होती. त्यामुळे त्यांनी चार दिवसांनंतर तेथून पुण्यात मुक्काम हलविला. त्यांचे पुण्यातील वास्तव्य संशयास्पद दिसून आले. त्यामुळे पुण्यात घातपाती कारवाया करण्याचा त्यांचा डाव होता की, पुण्यात लपून महाराष्ट्रासह देशात इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत ते होते याचादेखील तपास आता यंत्रणांकडून केला जात आहे.

हेही वाचा

पुण्यातील मुळा-मु्ठा नदी सुशोभीकरणाचे काम 20 टक्के पूर्ण

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या बैठकीत तीन सदस्यांना दाखविला बाहेरचा रस्ता!

इर्शाळवाडी दुर्घटना : आणखी 5 मृतदेह बाहेर काढले; 78 अद्याप बेपत्ता

Back to top button