पिंपरी : सर्व्हिस रस्त्यांसाठी 60 टक्के जागा ताब्यात

पिंपरी : सर्व्हिस रस्त्यांसाठी 60 टक्के जागा ताब्यात
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळूर हा 60 मीटर रुंदीचा महामार्ग पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मामुर्डी व किवळे या भागांतून जातो. या भागातील महामार्गाच्या बाजूने 12 मीटर रुंदीचा सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तयार करणार आहे. त्यासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी झालेल्या शिबिरास जागामालकांचा प्रतिसाद लाभला. साठ टक्क्यांपेक्षा अधिक जागा पालिकेच्या ताब्यात आली असून, उर्वरित जागा ताब्यात देण्यास जागामालकांनी तयारी दर्शविली आहे.

शिबिर गुरुवार (दि.17) व शुक्रवार (दि.18) असे दोन दिवस वाकड, किवळे व पुनावळे येथे घेण्यात आले. या वेळी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, सहायक संचालक संदेश खडतरे, उपअभियंता उमेश मोने, राजकुमार सूर्यवंशी, सुभाष काळे, अशोक कुटे, विजय भोसले तसेच, कनिष्ठ अभियंता व सर्व्हेअर व कर्मचारी उपस्थित होते. महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाकड येथे अंदाजे 3 हजार 710 मीटर लांबीचा सर्व्हिस रस्ता असणार आहे. तर, पुनावळेत 3 हजार 400 मीटर, रावेतमध्ये 2 हजार 740 मीटर, मामुर्डीत 1 हजार 400 मीटर आणि किवळेत 4 हजार 400 मीटर लांबीचा रस्ता होणार आहे. या रस्त्यासाठी जागा भूसंपादन करण्याची कार्यवाही शिबिरात करण्यात आली.

जागेचा नकाशा पाहून आपली जागा रस्त्यात जात असल्याची खात्री झाल्यानंतर जागामालकांनी कागदपत्रे सादर करून जागेचा आगाऊ ताबा दिला. जागेचे कागदपत्रे तपासून पात्रतेनुसार अ आणि ब प्रपत्र त्यांना शिबिरात देण्यात आली. एकूण 21 हजार 220 मीटर लांबीच्या क्षेत्रापैकी 4 हजार 387 मीटर क्षेत्र टीडीआर व एफएसआयच्या बदल्यात ताब्यात आले. यापूर्वी ही काही जागा टीडीआर व एफएसआयच्या बदल्यात ताब्यात आले आहे. एकूण 60 टक्क्यांपेक्षा अधिक जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. उर्वरित जागा ताब्यात देण्यास जागामालकांनी तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news