पिंपरी : रेल्वे स्थानकात भिकारी, मद्यपींचा वावर; महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष | पुढारी

पिंपरी : रेल्वे स्थानकात भिकारी, मद्यपींचा वावर; महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी(पुणे) : शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी वर्दळ असते. या स्थानकांतून लोकलने पुणे तसेच लोणावळ्याकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे; मात्र या स्थानकांत भिकारी, मद्यपींचा बिनधास्त वावर असतो. आकुर्डी रेल्वे स्थानकात तर सुरक्षारक्षकदेखील नसल्याने महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न वार्‍यावर असून, ‘पुढारी’ प्रतिनिधीने पिंपरी,चिंचवड व आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या केलेल्या पाहणीत आढळून आले.

पिंपरी स्थानक :

पिंपरी येथील रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते; मात्र हे स्थानक मद्यपींचा अड्डा बनले आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असते. तिकीट खिडकीच्या परिसरातच हे मद्यपी तसेच भिकारी झोपलेले आढळून येतात. पिंपरी स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे; मात्र तेथील बेसीनचा पाईप तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तेथील पाणी इतरत्र वाहून परिसर अस्वच्छ होत आहे; तसेच स्थानक परिसरात डासांचा उपद्रव जाणवत असल्याचे प्रवासी सांगतात.

आकुर्डी स्थानक  :

आकुर्डी येथील रेल्वेस्थानकातून शिवाजीनगर- लोणावळा दरम्यान धावणारी लोकल बंद असल्याने आमचे हाल होत असल्याचे प्रवासी सांगतात. या रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्याची नावालाच सुविधा असून, या स्थानकातील एकही नळाला पाणी नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येते; तसेच स्थानकात दिव्यांगांसाठीचे प्रसाधनगृह बंद अवस्थेत आहेत. स्टेशनवरदेखील मोठ्या प्रमाणात भिकारी आढळून येतात. हे भिकारी स्टेशनच्या आवारात घाण करत असल्याचे प्रवासी सांगतात.

चिंचवड स्थानक :

चिंचवड येथील रेल्वे स्थानक मोठे असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र, या स्थानक परिसरात टवाळखोर बसलेले असतात. तसेच स्टेशनवर भिकारी बसलेले आढळतात. स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळेेत तरुण- तरुणी अश्लील चाळे करताना पहायला मिळतात.  या संदर्भात येथील तिकीट मास्टर प्रशांत लिन्का यांनी माहिती देणे टाळले.

दहा रुपयाचे तिकीट हे फक्त नावासाठी

रेल्वे स्थानक फलाटावर प्रवेश करण्यासाठी दहा रुपयांचे तिकीट घ्यावे लागते; मात्र पिंपरी,चिंचवड, आकुर्डी रेल्वे स्थानकांतील संबंधित अधिकारी फलाटावर वावरणार्‍यांकडे तिकीट तपासणी करताना आढळून येत नसल्याने या रेल्वे स्थानकांत मद्यपी, भिकार्‍यांचा वावर वाढला आहे.
रेल्वे स्थानकांत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) तसेच राज्य पोलिस दलाचे सुरक्षारक्षक तैनात आहेत. स्थानकांत मद्यपी तसेच भिकारी आढळून आल्यास त्यांना परिसरातून हुसकावून लावले जाते. तसेच कोणी हुल्लडबाजी केल्यास दंडात्मक कारवाईदेखील केली जाते.
महेंद्र पाटील, स्टेशन मास्तर
महाविद्यालयात जाण्यासाठी मी पिंपरी रेल्वे स्थानकांतून ये-जा करते; मात्र स्टेशनवर मद्यपींचा वावर असतो. हे मद्यपी प्रवाशांना शिवीगाळ करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
– स्नेहल बाराथे, विद्यार्थिनी. 
सिग्नल अटोमॅटिक टेक्नॅालॉजी असल्यामुळे स्टेशन मास्टर नाही. तसेच पिंपरी, चिंचवड, दोपोडी सिग्नल अटोमॅटिक टेक्नॅालॉजी हे काम प्रगती पथावर आहे. तसेच या मशीन्सने 3 ते 4 किलोमीटर असल्यास मॅनेज करता येते. तसेच लोकल पावसाळा सुरु आहे तसेच काही ठिकाणी लोकलचे काम सुरु आहे. त्यामुळे लोकल उशीरा धावतात.
 – महेंद्र आयगोेळे मुख्य बुकिंग क्लर्क, आकुर्डी स्थानक. 
रात्रीच्या वेळेस स्थानकात प्रवाशांची वर्दळ कमी असते. तसेच स्टेशनवर रात्रीच्या वेळेस टवाळखोरांची टोळी असते. अशावेळी एकट्या महिलेने या स्थानकात थांबणे भीतीदायक वाटते.
– छाया कदम, प्रवासी.
मी नोकरीनिमित्त कामाला जाण्यासाठी – येण्यासाठी रेल्वेने प्रवास करतो. मात्र, रात्रीच्या वेळेत प्रवास करताना स्टेशवर टवाळखोर बसलेले असतात. तसेच रात्रीच्या वेळेत खूप अंधार असल्यामुळे तरुण – तरुणी या ठिकाणी बसून अश्लील चाळे करतात.
– प्रकाश चव्हाण, प्रवासी. 
हेही वाचा

Back to top button