पुणे : स्वातंत्र्यलढ्यातील बैठकीची जागा बनवलीय उत्पन्नाचे साधन! | पुढारी

पुणे : स्वातंत्र्यलढ्यातील बैठकीची जागा बनवलीय उत्पन्नाचे साधन!

पुणे : स्वातंत्र्यलढ्याबरोबर चळवळीचे धडे देऊन देशसेवेसाठी लढाई करण्यासाठी एकेकाळी ज्या जागेवर बैठकांचे सत्र चालायचे ती जागा हीच होती का? असे विचारण्याची वेळ आता आली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील ‘गोखले हॉल’ आणि त्या लगतची सर्व जागा विद्यमान पदाधिकार्‍यांनी भाडेकरूच्या ताब्यात देऊन प्रेरणादायी ओळख पुसण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसते. प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्नदेखील संस्थेच्या खात्यात न दाखवता ते परस्पर वळवले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेला लक्ष्मी रस्ता पुण्याची शान म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नावाने उभारलेला ‘गोखले हॉल’देखील असून, तो स्वातंत्र्य चळवळीची आठवण करून देतो. ना. गोखले यांच्या नावाने उभारलेला सभामंडप आज किरकोळ रकमेवर भाड्याने दिल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात याबाबत चौकशी केली असता त्या जागेवर संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी दुसर्‍याच्या नावाने व्यवसाय थाटला आहे. हस्तकला, शिल्पकलेच्या नावाखाली देण्यात आलेल्या फर्निचर व्यावसायिकाकडून भाडे म्हणून मोठी रक्कम स्वीकारली जात असल्याचे समजले. संस्थेच्या जागेतून मिळणारे उत्पन्न संस्थेत जमा होते का ? याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता, असे समजले की त्यातील बहुतांश रक्कम ही संस्थेत भरली जात नाही, तर संस्थेचे पदाधिकारी परस्पर ती रक्कम स्वतःकडे वळवत असल्याचे समजले. फर्निचर विक्रीसाठी भाड्याने दिलेली जागा आणि विद्यार्थ्यांना अभ्यासिका म्हणून दिलेल्या जागेसोबतच काही जागांचे भाडेही घेतले जात असून, त्याचीही स्पष्ट नोंद संस्थेच्या खात्यात नसल्याचे पदाधिकार्‍यांनी आक्षेपात नोंदवले आहे.

त्या जागेत लढ्यातील नेत्यांच्या बैठका
लक्ष्मी रोडवरील चौकात असलेल्या सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या जागेवर कधीकाळी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या बैठका होऊन आंदोलनाची दिशा निश्चित केली जात होती. आजच्या पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील त्या योद्धांच्या प्रेरणादायी माहिती मिळावी, असे संग्रहालय उभे करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता संस्था सचिव मिलिंद देशमुख यांनी मर्जीने त्या जागेवर फुटकळ विक्रेत्यांना बसवले. म्हणजेच भविष्यात ती जागा विस्तारीकरणाच्या नावाखाली व्यावसायिक स्वरूपात आपणास कशी वापरता येईल याचा विचार केला गेल्याचेही बोलले जात आहे. ज्या सभागृहाचा उद्देश जनजागरण आणि प्रबोधन करण्यासाठी तसेच कला जोपासण्यासाठी केला जायचा, त्याच गोखले हॉलचा वापर संस्थेचे सचिव स्वअर्थार्जनासाठी करीत असल्याचा आक्षेपही घेण्यात आल्याचे समजते.

संस्थेतच घटनाबाह्य उपाहारगृह सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम एप्रिल 2017 मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. सात कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीचा केवळ शैक्षणिक उद्देश दाखवून पालिकेसह सरकारकडून सर्व सवलती घेण्यात आल्या. पालिका प्रशासनाने सर्व क्लिअरन्स देत सहकार्य केले. मात्र, संस्थेचे सचिव असलेल्या मिलिंद देशमुख यांनी संस्थेच्या आवारातच हॉटेल अमेय थाटले. असे करणे घटनाबाह्य असले, तरी इतर सदस्यांना थांगपत्ता लागू दिला नाही. यासंदर्भात नागपूरचे दिवंगत सदस्य र. वि. नेवे यांनी त्यांच्या सहसदस्य असलेल्या आत्मानन्द मिश्रा यांना देशमुख यांच्या कृतीची माहिती देत लक्ष देण्याचे सांगितले होते.

पालिकेने बजावली होती नोटीस हॉटेल अमेय विनापरवाना अन् बेकायदेशीर असल्याच्या कारणावरून पुणे महापालिकेच्या वतीने ती पाडण्यात का येऊ नये, अशी नोटीसही बजावली होती. मात्र, ती फाईल बंद करण्यात आली. पालिकेची कारवाई थांबल्यामुळे आता देशमुख यांनी नियमबाह्य मोठी शेड उभारली आहे. महापालिकेला दिलेल्या या आव्हानाला महापालिका कशी उत्तर देते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा : 

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रा; आतापर्यंत ३ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन; गेल्या काही वर्षातील सर्वाधिक संख्या

पुणे : पार्सलमध्ये ड्रग्जच्या बहाण्याने लूट

 

Back to top button