जामिनानंतरही तब्बल सहा वर्षे 'तो' होता तुरुंगात; अखेर सुटका | पुढारी

जामिनानंतरही तब्बल सहा वर्षे 'तो' होता तुरुंगात; अखेर सुटका

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दरोड्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आलेल्या नेपाळमधीळ राकेश थापा याची सहा वर्षे 10 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका होणार आहे. गुन्ह्यात जामीन मंजूर झाला असतानाही अटींची पूर्तता न केल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम कायम होता. अखेर जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत चालविण्यात येत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाने अर्ज केल्यानंतर थापा याला मुक्त करण्याचा निकाल देण्यात आला. सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी हा निकाल दिला.

थापा हा जामीन होऊनही एकूण सहा वर्षे दहा महिने आणि 13 दिवस तुरुंगात असल्याची माहिती लोक अभिरक्षक कार्यालयाला समजली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने थापाच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठीचा अर्ज प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अभिरक्षक कार्यालयाचे अ‍ॅड. एन. एच. शेख आणि मदन कुर्‍हे यांनी दाखल केला. जामीन मिळणे व कारागृहातून सुटका होणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे.

नैसर्गिक न्यायानुसार त्याला न्याय मिळणे गरजेचे आहे. आरोपीने भोगलेली शिक्षा आणि न्यायालयापुढे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची कायमस्वरूपी सुटका व्हावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. शेख आणि कुर्‍हे यांनी केला. याखेरीज सुनावणीदरम्यान थापा याने त्याने केलेला गुन्हा कबूल केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद व गुन्ह्यासाठी असलेली शिक्षा तसेच थापाने भोगलेली शिक्षा या बाबी निदर्शनात घेत न्यायालयाने त्याची सुटका करण्याचा निकाल दिला.

हेही वाचा :

National Mango Day : पावसाळ्यात जेवणाची चव वाढविसाठी बनवा चटपटीत आंब्याचे लोणचे

फौजदार प्रेमचंद ऑन ड्युटी मद्यधुंद ! नशेत वाहनचालकांना केली शिवीगाळ

Back to top button