फौजदार प्रेमचंद ऑन ड्युटी मद्यधुंद ! नशेत वाहनचालकांना केली शिवीगाळ | पुढारी

फौजदार प्रेमचंद ऑन ड्युटी मद्यधुंद ! नशेत वाहनचालकांना केली शिवीगाळ

पुणे : वाहतूक विभागातील एका सहायक पोलिस फौजदाराने कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत वाहनचालकांना शिवीगाळ करून दंडाच्या नावाने पैशाची मागणी करत राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘दो घुट मुझे भी..पिलादे शराबी फिर देख होता है क्या..’ या अविर्भावात सहायक फौजदाराने वाहनचालकांस आपल्या वर्दीचा हेका दाखविला. मात्र, ते हे विसरले की, ऑन ड्युटी मद्यप्राशन अन् कारवाई किती अंगलट येऊ शकते. त्यामुळे सहायक फौजदार प्रेमचंद ’ऑन ड्युटी मद्यधुंद’ची खुमासदार चर्चा पोलिस दलात रंगली होती. याप्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित सहायक पोलिस फौजदाराला पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांंनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

प्रेमचंद भानुदास वेदपाठक असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक पोलिस फौजदाराचे नाव आहे. प्रेमचंद हे बुधवारी शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत थोरात चौकात दिवसपाळी कर्तव्यावर होते. भरदिवसा बाराच्या सुमारास त्यांनी मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. त्यानंतर ते चौकात येणार्‍या-जाणार्‍या वाहनचालकांना अडवून दारूच्या नशेत शिवीगाळ करून दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी करत होते. भरचौकात हा प्रकार सुरू होता.

नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी त्यांचा हा मद्यधुंदपणा मोबाईलमध्ये कैद केला होता. हा प्रकार तेथून चाललेल्या महिलेने पाहिला. त्यांनी याबाबत शिवाजीनगर वाहतूक विभागात लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त मगर यांनी प्रेमचंद यांना कर्तव्यावर असताना पोलिस खात्यास अशोभनीय असे गैरवर्तन करून गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे.

हे ही वाचा :

अतिवृष्टीमुळे देशभरात मृतांची संख्या ७४७ वर; २३५ जिल्ह्यांत पूरसद़ृश स्थिती

अहमदनगर : दुहेरी हत्याकांडातील सहा आरोपी जेरबंद

Back to top button