रिल्स पाहताय, वेळीच व्हा सावधान..! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेन फॉग | पुढारी

रिल्स पाहताय, वेळीच व्हा सावधान..! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेन फॉग

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या ऑनलाईन जगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईलचे वेध लागले आहे. अनेकजण दिवसभर मोबाईलवर विविध खेळ खेळण्यात व्यस्त असतात. तर, काही जण सोशल मीडियावरील नक्कल केलेले व्हिडिओ पाहतात. मात्र, त्याचा विपरीत परिणामदेखील होऊ शकतो. स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष न लागणे, थकवा येणे, चिडचिडेपणा, सुस्तीची भावना येणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे ‘ब्रेन फॉग’ हा आजार होण्याचा धोका वाढला आहे.

सोशल मीडियाचा वापर सध्या खूप वाढला आहे. त्यातही हातात स्मार्ट फोन आला की, बर्‍याचदा त्याचे भान अनेकांना राहत नाही. बसमध्ये, शतपावलीसाठी जाताना, रस्त्यावरुन ये-जा करताना मोबाईलचा वापर केला जातो. सध्या कोणतीही व्यक्ती सोशल मीडियावर  सहज कोणताही अ‍ॅप वापरू शकते. इन्स्टाग्राम, चिंगारी, जोश, यू-टयूब हे अ‍ॅप सध्या सर्वाधिक पाहिले जातात.

मात्र हे अ‍ॅप वापरत असताना वेळेचे नियोजन होत नाही. मोठा वेळ हा रिल्स पाहण्यात जातो. नक्कल केलेला व्हिडिओ कोणीही तयार करू शकतो. हे व्हिडिओ एकामागे- एक येत असल्यामुळे व्हिडिओ पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यामुळे तुम्हाला ब्रेन फॉगचा त्रासदेखील होऊ शकतो, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

ब्रेन फॉग म्हणजे काय ?

ब्रेन फॉग म्हणजे एखादी व्यक्ती मोबाईलचा अतिवापर करत असल्यास त्या व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते. व्यक्तीचे लक्ष लागत नाही. एखादी माहिती समजण्यास अडथळा येतो. थोड्या- थोड्या वेळाने व्यक्ती चिडचिड करू लागते, अशी लक्षणे आढळल्यास त्याला ब्रेन फॉग म्हणतात.

रात्रीचे जागरण वाढले

सोशल मीडियावर नक्कल केलेले व्हिडिओ एकापाठोपाठ उपलब्ध असल्यामुळे अनेकजण कित्येक तास रिल्स पाहतात. शाळेतील मुलांनादेखील त्याचे वेड लागले आहे. मात्र, त्यामुळे शारीरिक, मानसिक त्रास वाढत आहे. त्याच बरोबरीने रात्री जागरण करून मोबाईल पाहण्याकडेदेखील बर्‍याच जणांचा कल वाढला आहे. त्यामुळे एक निश्चित वेळ ठरवूनच मोबाईलचा वापर करायला हवा.

एखादी व्यक्ती जर जास्त प्रमाणात मोबाईल पाहत असेल तर त्या व्यक्तीचे कामामध्ये लक्ष लागत नाही. चिडचिडेपणा, एकटेपणा वाढतो. विसरभोळेपणात वाढ होते. सर्व गोष्टींचे आकलन करून निर्णय घेण्याची शक्ती कमी होत जाते. त्यामुळे मोबाईलचा कमीत-कमी वापर करणे गरजेचे आहे.

– डॉ. पूजा मिसाळ, मानसोपचार

हेही वाचा

तळेगाव येथे आपत्तीकालीन परिस्थितीबाबत डेमो कॅम्प

धक्कादायक! आळंदीत प्लॅस्टिक पिशवीत आढळले एक दिवसाचे अर्भक

सातारा: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी एकास फाशीची शिक्षा

Back to top button