Satara News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी एकास फाशीची शिक्षा | पुढारी

Satara News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी एकास फाशीची शिक्षा

कराड: पुढारी वृत्तसेवा: आठ वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी रुवले (ता. पाटण) येथील संतोष चंद्रू थोरात (वय 41) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी ही शिक्षा आज (शुक्रवारी)  सुनावली. पश्चिम महाराष्ट्रातील चाळीस वर्षातील हा महत्वपूर्ण निकाल मानला जात (Satara News)  आहे.

पाटण तालुक्यातील रुवले येथे 29 डिसेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती. पीडित मुलगी व तिची मैत्रिण आरोपीच्या घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी तिची मैत्रिण घरी गेली व पीडित मुलगी एकटीच खेळत असताना आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. व तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह नजीकच्या ओघळीतील झुडपात सुमारे 30 फूट खोल फेकून (Satara News)  दिला.

दरम्यान, पीडित मुलगी उशीरा पर्यंत घरी न आल्याने घराच्यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची  दखल घेत गावात येऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी संतोष थोरात याच्यासोबत पीडित मुलगी गेल्याचे निष्पन्न झाले. शिवाय आरोपीबरोबर मुलीला जाताना तिची मैत्रिण, आजी, व नजीक असणाऱ्या दोन महिलांनी शेवटचे पाहिले होते. हेही तपासात समोर आले. यानुसार आरोपीला पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने एकूण 33 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगीची मैत्रिण, आजी, शेजारील दोन महिला, चॉकलेट दुकानदार, ग्रामसेवक यांच्या साक्षी तसेच सीसीटीव्ही फुटेज व शवविच्छेदन अहवाल महत्वपूर्ण ठरला. साक्षी, पुरावे व सरकार पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी संतोष थोरात याला बलात्कार व खूनप्रकरणी दोषी धरून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील ॲड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले.

हेही वाचा 

Back to top button