पिंपरी शहरात घुमतोय ढोल-ताशांचा खणखणाट | पुढारी

पिंपरी शहरात घुमतोय ढोल-ताशांचा खणखणाट

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाची चाहूल लागताच लगबग सुरू होते ती ढोल-ताशा पथकांच्या सरावाची.. आणि सुरू होतो जल्लोष, ढोल-ताशांचा. गणेशोत्सवात वाजविल्या जाणार्‍या ढोल-ताशांच्या पथकांची क्रेझ तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील घाटाजवळ मोकळ्या मैदानांमध्ये सध्या ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. गणेशोत्सव जवळ येताच ढोल-ताशा वाजविण्यासाठी तरुणाईचे हात शिवशिवायला लागतात. दरवर्षी गणेशोत्सवात ही ढोल-ताशा पथके काही तरी नावीन्य घेऊन आपली कला सादर करतात. ढोल-ताशा वादनामुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणाचा, जमणार्‍या गर्दीचा फटका आजारी माणसे आणि विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना व्हायला नको, म्हणून लोकवस्तीपासून दूर वादनाचा सराव केला जात आहे.

देश-विदेशात आकर्षण असलेल्या पुण्याच्या गणेश उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली ढोल-ताशा पथके म्हणजे सळसळत्या तरुणाईच्या ऊर्जेचे प्रतीक. सुरुवातीला हाताच्या बोटावर आणि मानाच्या गणपतीपुरती मर्यादित असलेली ढोल-ताशा पथके आता शेकडोच्या संख्येत झाली आहेत. हजारो तरुण, तरुणी, विद्यार्थी, महिला, लहान मुले ढोल-ताशा पथकात सहभागी होतात. खास करून आयटी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील तरुणाईचा सहभाग असतो.

आवाजापेक्षा सादरीकरणाला महत्त्व

हल्ली मिरवणुकीला मोठा आवाज असला पाहिजे, अशी मागणी असते. पण आवाज होण्यापेक्षा काही पथके सादरीकरणाला जास्त महत्त्व देतात. पर्यावरणात होणारे ध्वनिप्रदूषण टाळता येते. मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार ढोल वाजविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पण जेव्हा वादन करण्यासाठी बोलवणे येते तेव्हा पथकाने काही अटी ठेवल्या आहेत. त्या म्हणजे मिरवणुकीत एकाही कार्यकर्त्याने दारू पिऊन सामील व्हायचे नाही. मिरवणुकीसमोर कोणीही नाचणार नाही. तसेच साउंड सिस्टिम लावायची नाही, अशा अटी मान्य असतील तरच पथक वादनाचा कार्यक्रम केला जातो.

हेही वाचा

भारतीय उद्योगांपुढे आता निर्यातीचे मोठे संकट

पुणे : दरडींचा धोका असलेल्या गावांवर ‘जागता पहारा’

इर्शाळवाडी दुर्घटना : सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती
.

Back to top button