इर्शाळवाडी दुर्घटना : सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती | पुढारी

इर्शाळवाडी दुर्घटना : सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती

मुंबई : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे आमदार महेश बालदी यांच्यासोबत रात्री तीन वाजता घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात केली. हे बचावकार्य किती अवघड आहे, याचे परिस्थिती हाताबाहेरची आहे, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी व्यक्त केली.

महाजन यांनी आपल्या शब्दांत तेथील भयाण परिस्थिती सांगितली. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीत दरड कोसळल्याचे समजताच महाजन तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान ते इर्शाळवाडीला पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार महेश बालदी हेदेखील होते.मदतकार्यातील अडथळे सांगताना महाजन म्हणाले, अंधार असल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात वाट काढत आम्ही घटनास्थळ गाठले. तुफान पाऊस कोसळत होता. सोबत जोराचा वाराही होता. सर्वत्र अंधराचेच साम्राज्य होते.

डोंगराळ भाग, घटनास्थळी पायी जावे लागणार होते. जाण्याचा रस्ता केवळ तीन फुटांचा. बाजूला खोल दरी, जोराचा वारा आणि वरून पाऊस. पायी चालणेही कठीण जात होते. जवळच्या गावांमधून 50 ते 60 गावकर्‍यांची टीम मदतीकरिता जमवली. तोपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते. डोंगराळ भाग असल्यामुळे बचावकार्यासाठी जेसीबी वगैरे यंत्रांचा वापर शक्यच नव्हता. शेवटी अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीविना बचावकार्य सुरू केले. मातीचा मलबा उपसण्याच्या कामी सर्व जण लागले. पाऊस सुरूच होता. त्यामुळे जेवढा मलबा उपसत होतो त्यापेक्षा जास्त मलाबा वरून पुन्हा जमा होत होता. वाटही निसरडी झाल्याने मदतकार्य करणारे घसरून पडत होते. सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती.

Back to top button