अरे व्वा..! पवना धरण निम्मे भरले | पुढारी

अरे व्वा..! पवना धरण निम्मे भरले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण 50.04 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर लक्षात घेता धरण एक ते दोन दिवसांत अर्ध्यापेक्षा अधिक भरेल, असा अंदाज आहे. जून महिन्याच्या अखेरीपासून पवना धरण क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणात हळूहळू पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मावळात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

गुरुवारी (दि. 20) सकाळपर्यंत धरणात 48 टक्के पाणीसाठा होता. गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच, पावसाचा जोर कायम आहे. ओढे, नदी व नाले पाण्याने भरून वाहत आहेत. त्यामुळे दिवसभरात धरण 50 टक्के भरले आहे. आतापर्यंत एकूण 1099 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

उशिरा का होईना पावसाने जोर धरल्याने शेतकर्‍यांसह नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. असाच पाऊस राहिल्यास लवकरच धरण 100 टक्के भरेल, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरणात तब्बल 70.42 टक्के इतका पाणीसाठा होता. तर, एकूण 2809 मिलीमीटर पाऊस झाला होता.

हेही वाचा

पिंपरी शहरात घुमतोय ढोल-ताशांचा खणखणाट

इर्शाळवाडी दुर्घटना : सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती

सांगली : संभाव्य भूस्खलन भागाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

Back to top button