खडकीत टोळक्याने वाहने फोडली ; दहशत पसरविण्याचा प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहशत निर्माण करण्याच्या हेतूने नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने खडकी-औंध रोड परिसरातील वीर भगतसिंग चौक, पहचाळवस्ती येथे वाहने फोडली. त्यामध्ये एक रिक्षा आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. टोळक्याने वस्तीतील नागरिकांच्या घराच्या दरवाजाच्या बाहेरून कड्या लावून कोयता, लाकडी दांडके, रॉड हवेत उंचावून ’आम्ही येथील भाई आहोत’ असे म्हणत दहशत निर्माण केली. याप्रकरणी ओंकार सोकटे (वय 25) याने खडकी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.
आदित्य भारती शेंडगे (वय 20), तेजस ऊर्फ बलमा अर्जुन गायकवाड (वय 20) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, तर एका अल्पवयीन मुलासदेखील ताब्यात घेतले आहे. आरोपी हे पूर्वी फिर्यादींच्या वस्तीत राहण्यास होते. 16 जुलै रोजी रात्री टोळक्याने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी आणि रिक्षावर दगड, लाकडी दांडके आणि कोयत्याने तोडफोड केली. त्यानंतर घराच्या दरवाजाच्या कड्या लावून राडा घालत दहशत निर्माण केली. तसेच ‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागल्यास एकेकाला बघून घेऊ,’ अशी धमकी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
हेही वाचा :
पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या दुर्गम भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश