पुणे : मिळकतींच्या बदलाविषयी केवळ 72 तक्रारी | पुढारी

पुणे : मिळकतींच्या बदलाविषयी केवळ 72 तक्रारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर करणार्‍यांची माहिती मागविण्यासाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जाहीर केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मागील दोन आठवड्यांत केवळ 72 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरात निवासी मिळकतींमध्ये अनधिकृतणे व्यावसायिक कार्यालये, विविध उत्पादने आणि उत्पादनांची विक्री, हॉटेल, ब्युटी पार्लर असे व्यवसाय केले जातात. या मिळकतींची निवासी म्हणून नोंद झालेली असल्याने त्याच दराने मिळकतकर आणि पाण्याचा दर आकारण्यात येतो. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते.

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकतींच्या थकबाकीदारांवर कारवाईसोबतच आकारणी न झालेल्या मिळकती शोधून आकारणी करण्याचे काम मिळकतकर विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासोबतच वापरात बदल केलेल्या मिळकतींची आकारणी करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत अशा मिळकतींची माहिती मिळावी, यासाठी मिळकतकर विभागाने दोन आठवड्यांपूर्वी एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक प्रसिद्ध केला आहे.

या क्रमांकावर आतापर्यंत जेमतेम 72 तक्रारी आल्या आहेत. यापैकी 15 तक्रारी या बांधकाम विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित तक्रारींनुसार निरीक्षकांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्या परिसरातील निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेला मोबाईल क्र. 8308059999 वर माहिती द्यावी. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा :

पुण्यासह उपनगरांत संततधार; घाटमाथ्यावर मुसळधार

पुणे : दहशतवाद्यांकडे ड्रोनचे साहित्य अन् स्फोटके

 

Back to top button