

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून ड्रोन बनविण्याचे साहित्य व स्फोटकाच्या पांढर्या गोळ्या घर झडतीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न आणि त्यांच्याकडे सापडलेले साहित्य पाहता आरोपींचा मोठा घातपाताचा कट असल्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास फिरत आहे. न्यायालयाने दोघांना 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मोहम्मद खान आणि मोहम्मद या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिरादार यांनी कोठडी सुनावली. याबाबत पोलिस शिपाई अमोल शरद नजन (26) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर त्यांचा साथीदार मोहम्मद आलम फरार झाला आहे.
बुधवारी दुपारी तीन वाजून 50 मिनिटांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले. या वेळी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आरोपींबद्दल न्यायालयात माहिती दिली. दोघेही राजस्थान येथील बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक हालचाली प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यात फरार होते. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत व त्यांच्या कोंढवा येथील घर झडतीतून लॅपटॉप, मोबाइल, पिस्तुलाचे पाऊच तसेच ड्रोन बनविण्याचे साहित्य सापडल्याचे सांगितले. त्यावर सरकारी वकील रेणुका देशपांडे कर्जतकर यांनी दोघांनाही आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. दरम्यान, दोघांकडून एक जिवंत काडतुस सापडले आहे. आरोपींच्या वतीने अॅड. यशपाल पुरोहित आणि अॅड. सौरभ मोरे यांनी युक्तिवाद करत न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.
पोलिसांना घ्यायचाय ड्रोनचा शोध
दोन दहशतवाद्यांकडे ड्रोन बनविण्याचे साहित्य सापडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ड्रोन बनवले असण्याची शक्यता पाहता, बनवलेला ड्रोन त्यांनी नक्की कोठे लपवून ठेवला आहे. त्याचा तपास करून हस्तगत करण्यासाठीही पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यांचे आणखीन साथीदार असण्याची शक्यता, त्यांच्याकडे सापडलेल्या बनावट दुचाकी आणि घरगुती कुलपांच्या चाव्या याबाबतही तपास करायचा आहे. त्यांनी कोणते दहशतवादी कृत्य केले अगर कसे ? या वेळी फरार झालेल्या आरोपीचाही शोध घ्यायचा असल्याने सरकारी वकील रेणुका देशपांडे कर्जतकर यांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.
न्यायालयाला छावणीचे स्वरूप
बुधवारी दुपारी दोन दहशतवाद्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयात मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, युनिट 4 चे पोलिस निरीक्षक गणेश माने, युनिट 3 चे श्रीहरी बहिरट, सिंहगड पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक जयंत राजुरकर यांसह इतर अधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हे ही वाचा :