पुण्यासह उपनगरांत संततधार; घाटमाथ्यावर मुसळधार | पुढारी

पुण्यासह उपनगरांत संततधार; घाटमाथ्यावर मुसळधार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत बुधवारी अगदी सकाळपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहिले. तर शहराच्या अनेक भागांत पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असल्याचे दिसून आले. चाकरमान्यांचेही चांगलेच हाल झाले. दरम्यान, पुण्यासह घाटमाथ्यावर 25 जुलैपर्यंत हलका ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र, बुधवारपासून राज्याच्या सर्वच भागांत मान्सून सक्रिय झाला. शहर आणि परिसरात अगदी सकाळपासून पावसाने जोर धरला.

अधूनमधून पाऊस थांबला असला, तरी त्याची संततधार मात्र सुरू होती. पावसाच्या जोरामुळे हवेत चांगलाच गारवा तयार झाला होता. पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. विशेषत: शहरात बहुतांश रस्त्यात पडलेले खड्डे न बुजविल्यामुळे पावसाचे पाणी या खड्ड्यात साठले. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे न दिसल्यामुळे वाहने खड्ड्यात आदळण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. तर सिग्नल यंत्रणा पावसामुळे बंद पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह अगदी उपनगरातसुध्दा वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे भिजू नये यासाठी छत्र्या उघडल्या गेल्या. तसेच रेनकोटसुध्दा अंगावर परिधान केले असल्याचे दिसून आले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 25 जुलैपर्यंत शहरात ढगाळ वातावरण तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शहरात पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
पुणे- 6.4, पाषाण- 10.3, लोहगाव- 17.4, चिंचवड- 8, कोरेगाव पार्क- 2.6, हडपसर- 1.5, वडगाव शेरी- 2, एनडीए- 6.6, आंबेगाव- 0.5, मगरपट्टा- 0.5, बालेवाडी- 7, लवळे- 4

हेही वाचा :

Irshalgad Landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

 रायगड : एनडीआरएफच्या टीमने वाचवले १० दिवसाच्या बाळसह ६ जणांचे जीव

Back to top button