बालभारतीच्या ‘डोमेन’ जाहिरातीचे पडसाद ; माजी शिक्षणमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी | पुढारी

बालभारतीच्या ‘डोमेन’ जाहिरातीचे पडसाद ; माजी शिक्षणमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बालभारतीचा संकेतस्थळ पत्ता (डोमेन) दोन हजार डॉलर्सना विकण्याबाबतच्या ऑनलाइन जाहिरातीचे पडसाद विधानसभेतही उमटले. माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. ‘बालभारती’कडून शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई, अभ्यासक्रम संशोधन करण्यात येते. ही संस्था राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित आहे. ‘ balbharati. in’ हे डोमेन दोन हजार डॉलर्सना विकण्यासाठी उपलब्ध नसल्याची जाहिरात ऑनलाइन असल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. त्यामुळे शिक्षण विभागात गोंधळ उडाला. ’ balbharati. in हे संकेतस्थळ बालभारतीने 2005 मध्येच नोंदणीकृत करण्यासह वेळोवेळी त्याचे नूतनीकरणही केले असल्याचे नमूद करून बालभारतीकडून संकेतस्थळ हॅकिंगसंदर्भातील तक्रार पुणे सायबर पोलिसांत दाखल करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बालभारतीच्या डोमेन जाहिरातीचा विषय विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बालभारतीचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर्समध्ये विकणे आहे, अशी जाहिरात गुगलवर झळकली आहे. या जाहिरातीमुळे शालेय शिक्षण विभागात सध्या सुरू असलेला सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया फेब—ुवारी 2023 मध्ये केली असताना असा गंभीर प्रकार कसा काय घडू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच हा फसवणुकीचा किंवा हॅकिंगचा प्रकार आहे का, याबाबत शासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

हे ही वाचा : 

पुणे : दहशतवाद्यांकडे ड्रोनचे साहित्य अन् स्फोटके

पुणे : थिटेवाडी धरण कोरडे पडले

Back to top button