पुणे : थिटेवाडी धरण कोरडे पडले | पुढारी

पुणे : थिटेवाडी धरण कोरडे पडले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : नियोजनाअभावी पाबळ, केंदूर (ता. शिरूर) परिसरातील थिटेवाडी धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे पाबळ व केंदूर येथील पिण्याच्या पाण्याची योजना बंद पडली आहे. ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
पाबळचे सरपंच सचिन वाबळे यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट देऊन टँकरचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती. यानुसार पाबळ येथील गावठाण व वाड्यावस्त्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. थिटेवाडी धरणावर अवलंबून असणार्‍या केंदूर गावाला धरण कोरडे पडल्याचा फटका बसला आहे.

गावठाणाला एक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या खैरेवाडी गावासाठी एक टँकर मंजूर करण्यात आला आहे. धरणाची पाण्याची क्षमता 0.37 टीएमसी एवढी असताना बेकायदा मृतसाठ्यातील पाणी उपसले जाते. यामुळे प्रत्येक वर्षी पाबळ – केंदूर या गावाला ऐन पावसाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची संतप्त भावना पाबळ- केंदूर येथील नागरिकांनी व्यक्त केली. सिंचन विभागाच्या अधिकार्‍यांनी थिटेवाडी धरणाच्या पाण्याचे नियोजन केल्यास व बेकायदेशीर उपसा पाणी सिंचनाला विरोध केल्यास पाबळ व केंदूर या दोन गावांच्या सुमारे 30 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो.

Back to top button